ललितकलांनी माणसाचे आयुष्य समृद्ध होते. मग, ती कला गायनाची असो, वाद्यवादनाची, नृत्य, चित्रकला किंवा शिल्पकला. अशा विविध क्षेत्रांमध्ये कलेकलेने कलाकार वाढतो आणि त्याचा आविष्कार सर्वांना समृद्ध करत असतो. पण, स्वान्तसुखाय कलेची आराधना करणारे कलाकार त्यांच्या सर्जनात्मक प्रवासाविषयी लेखन करत नाहीत, अशी खंत साहित्य वर्तुळातून केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये कलाकारांच्या, मग ते गायक असो वा अभिनेते, कलाप्रवासाविषयी मांडणी करणारी पुस्तके दस्तावेज म्हणून वाचकांसमोर आली आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कंठसंगीताच्या उपासकांची जडणघडण शब्दरूपाने वाचकांसमोर आली अशी किमान चार पुस्तकांची नावे सांगता येतील. आणि प्रेरणादायी अशा चरित्रात्मक पुस्तकांना वाचकांकडूनही मागणी असते.
जन्मशताब्दीचे औचित्य साधून ज्येष्ठ गायक पं. जितेंद्र अभिषेकी, पं. सी. आर. व्यास आणि आपल्या भावगीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा या कंठसंगीताच्या उपासकांची जडणघडण शब्दरूपाने वाचकांसमोर आली आहे. प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या कलाप्रवासाचा वेध घेणारे ‘स्वरचंद्रिका’ हे पुस्तक प्रकाशनाच्या टप्प्यावर आहे.
पं. जितेंद्र अभिषेकी; शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपे शैला मुकुंद यांनी लिहिलेल्या ‘अभिषेकी – पं. जितेंद्र अभिषेकी : कला आणि जीवनप्रवास’ या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून उलगडली आहेत. अभिजात संगीत, नाट्यसंगीत, भावगीते, भक्तिगीते, अभंग असे विविध गायनप्रकार लीलया हाताळणारे गायक, विविध बंदिशींची निर्मिती करणारे वाग्येयकार आणि संगीत रंगभूमीला सुवर्णकाळाची प्रचिती देणारे संगीतकार अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर लेखनातून यशस्वी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
ज्येष्ठ गायक पं. सी. आर. व्यास यांच्या सांगीतिक प्रवासाचा वेध घेणाऱ्या ‘चिंतामणी-एक चिरंतन चिंतन’ या पुस्तकाची निर्मिती ग्रेस (गुणीजन रीसर्च आर्ट, कल्चर ॲण्ड एज्युकेशन) फाउंडेशन आणि पंचम निषाद या संस्थांनी केली आहे. श्रुती पंडित आणि शशी व्यास यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून व्यास यांची शिष्य, साधक, ‘गुणीजान’ या नावाने बंदिशींची निर्मिती करणारे रचनाकार आणि शिष्य घडविणारे गुरू अशी चाैफेर वाटचाल उलगडली आहे.
माणिक वर्मा हे नाव उच्चारताच काना-मनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीत क्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला. त्याचा वेध ‘माणिक मोती-माणिक वर्मा आणि परिवार’ या शोभा बोंद्रेलिखित पुस्तकातून घेण्यात आला आहे. भारती आचरेकर, वंदना गुप्ते या अभिनेत्री, प्रसिद्ध गायिका राणी वर्मा आणि नामांकित फिजिओथेरपिस्ट अरुणा जयप्रकाश या त्यांच्या कन्यांचे मनोगत असलेले हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने वाचकांना माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीची भेट म्हणून दिले आहे. डाॅ. सदानंद बोरसे यांनी त्याचे संपादन केले आहे.
‘हासरा नाचरा जरासा लाजरा श्रावण आला’ या कर्णमधुर गीताने मराठी घराघरांत श्रावणाची चाहूल लागते, ते गीत गाणाऱ्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची चार दशकांची कारकीर्द चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘स्वरचंद्रिका… एक सांगीतिक प्रवास’ या पुस्तकातून उलगडली आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान सभागृह येथे १३ जुलै रोजी ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमात या पुस्तकाचे संपादन करणाऱ्या डॉ. संगीता गोडबोले या पद्मजाताईंची मुलाखत घेणार असून, अनेक गाण्यांच्या गोष्टी आणि पद्मजाताईंची काही खास गाणी रसिकांना ऐकता येणार आहेत.