पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त केंद्र सरकारने करोना लशीची वर्धक मात्रा सर्वासाठी मोफत उपलब्ध करून दिली असली तरी राज्यातील १८ ते ५९ वर्ष वयोगटातील अवघ्या सात टक्के नागरिकांनी ती घेतली आहे. करोना साथरोगाचे स्वरूप सौम्य झाले असले तरी ती संपलेली नाही, त्यामुळे वर्धक मात्रा घेण्याबाबत टाळाटाळ नको, असे आवाहन साथरोग तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

वर्धक मात्रा मोफत उपलब्ध करून दिल्यानंतर राज्यभरात ४२ टक्के आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी, तर इतर आघाडीच्या क्षेत्रांतील (फ्रंटलाईन) ३९ टक्के कर्मचाऱ्यांनी वर्धक मात्रा घेतली. ६० वर्षांवरील वयोगटातील २७ टक्के नागरिकांनी मोफत वर्धक मात्रा घेतली. मात्र, १८ ते ५९ वर्ष वयोगटातील वर्धक मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे सात टक्के आहे.  राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे.

करोना काळात प्रतिबंधात्मक लसीकरणाला मिळालेला प्रतिसाद साथरोगाची तीव्रता कमी झाला आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या प्रभावामुळे आलेली करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर करोना लशीच्या वर्धक मात्रेकडेही नागरिकांचे दुर्लक्ष झाले. नुकतीच ओमायक्रॉनच्या बीए.४, बीए.५ आणि बीए.२.७५ या प्रकारांमुळे करोना रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर सशुल्क असलेली करोना लशीची वर्धक मात्रा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. मात्र, वर्धक मात्रा मोफत दिल्यानंतरही १८ ते ५९ वर्ष वयोगटातील नागरिक ती घेण्याबाबत फारसे उत्सुक नसल्याचेच राज्यातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

लसीकरण हिताचे..

नवी दिल्लीमध्ये करोना संसर्गाचा दर २० टक्क्यांवर गेला आहे. ओमायक्रॉनच्या बीए.२.७५ ही वाढ होत असल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्रातही या प्रकारामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे बाधित रुग्णांच्या जनुकीय क्रमनिर्धारणातून दिसून आले आहे. त्यामुळे लसीकरणाकडे पाठ फिरवणे हिताचे नाही. वर्धक मात्रा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सुरक्षा कवच म्हणून लसीकरण पूर्ण करणे सर्वाच्या आरोग्यासाठी हिताचे आहे, असे आवाहन ज्येष्ठ साथरोगतज्ज्ञ आणि राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी केले आहे.