पुण्यात आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करणाऱ्या तरुणाने प्रेयसीचा न्यूड तिच्या मैत्रिणीला आणि मित्राला पाठवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीने २७ वर्षीय प्रियकराच्या विरोधात सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे दोघे ही उच्चशिक्षित असून पुण्यातील आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नामांकित कंपनीत आरोपी आणि पीडित तरुणी एकत्र काम करतात. त्यांची अगोदर मैत्री होती. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ते लग्नदेखील करणार होते. वर्क फ्रॉम असल्याने ते दुरावले होते. दोघे दररोज व्हॉट्सअप चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात राहायचे.




आपण लग्न करणार आहोत तू तुझा न्यूड व्हिडिओ काढून पाठव असं प्रियकराने पीडित तरुणीला सांगितलं होतं. त्याला होकार देऊन तरुणीने न्यूड व्हिडिओ पाठवला होता. दरम्यान, काही कारणामुळे त्यांचा ब्रेकअप झाला आणि तरुणीने दुसऱ्या तरुणाशी मैत्री केली. याचाच राग मनात धरून आरोपी तरुणाने प्रेयसीच्या मैत्रिणीला आणि मित्राला न्यूड व्हिडिओ पाठवले. हे प्रकरण कळल्यानंर तरुणीने सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली नसून त्याचा शोध सुरू आहे असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, प्रेमप्रकरणात किंवा मैत्रीत अशा प्रकारे न्यूड व्हिडिओची मागणी केल्यास त्याला नकार द्यावा, आणि संबंधित मुलाशी संपर्क ठेवू नये असं आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे यांनी केलं आहे. सध्या इंटरनेट युग आहे, ते जपून वापरावं असंदेखील त्यांनी म्हटलं आहे.