पिंपरी : शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ६१ लाख ६४ हजार ९४१ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्‍यात आली. ही घटना चिंचवड परिसरात सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडली.

याबाबत महिलेने चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत चिंचवडमधील महिलेशी ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. त्‍यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्‍यांचा विश्वास संपादन करण्यात आला. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार संदेश पाठवून फिर्यादीकडून मोठी रक्कम वसूल करण्यात आली. मात्र गुंतवणुकीचा कोणताही परतावा देण्यात आला नाही किंवा गुंतवणूक केलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

हिंजवडीत हॉटेलमधील कामगारावर हल्ला

एका कॅफेमध्ये अगोदरच्‍या ग्राहकांना प्रथम चहा देतो त्‍यानंतर तुम्‍हालाही देतो, असे कामगाराने सांगितल्‍याच्‍या कारणावरून कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजताच्‍या सुमारास हिंजवडी फेज-२ येथे घडली.

याबाबत २९ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्‍यपात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्‍या हॉटेलमध्‍ये आला. त्‍याने कामगाराकडे चहा मागितला. मात्र तुमच्‍या आधीच्‍या ग्राहकांना चहा देतो मग तुम्‍हालाही देतो, असे सांगितले. या कारणावरून संतापलेल्‍या आरोपीने काऊंटरवरून उडी मारून आत प्रवेश केला. कामगाराला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्‍यानंतर आरोपीने चहा ढवळण्याच्या पळीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली. कामगाराच्‍या गुप्‍तांगावरही मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

जुन्या वादातून नातेवाईकावर सिमेंटच्या गट्ट्याने हल्ला

जुन्या वादाचा राग मनात धरून दोन भावांनी मिळून एका नातेवाईकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना नेहरूनगर, पिंपरी येथे घडली आहे.

याबाबत ४० वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच्‍या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे आरोपींनी आपसांत संगनमत करून जुन्‍या वादातून फिर्यादी यांच्या भावास सिमेंटच्या गट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

काळेवाडी फाट्यावर मटका जुगारावर छापा; दहा जणांविरुद्ध गुन्हा

काळेवाडी फाटा परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकून दहा जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

गुन्‍हे शाखेच्‍या मालमत्‍ता विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुमित दत्तात्रय देवकर यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, जुगार सुरू असताना आरोपी पकडण्यात आले. आरोपींकडून रोख रक्‍कम, जुगाराचे साहित्‍य असा एकूण २६ हजार ११४ रुपयांचा मुद्‌देमाल हस्‍तगत करण्‍यात आला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

दापोडीत गांजासह तरुणाला अटक

गांजाची विक्री करत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गांजा व मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई गुरुवारी दापोडीत करण्‍यात आली.

सचिन वसंत कांबळे (वय ३३, रा. दापोडी) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार विजय दीपक दौंडकर यांनी दापोडी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी गांजा विक्री करीत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी सापळा लावून संशयित आरोपी सचिन कांबळे याला ताब्‍यात घेतले. त्‍याची झडती घेतली असता त्‍याच्‍याकडे २०८ ग्रॅम गांजा मिळून आला. तसेच त्‍याच्‍याकडून दोन मोबाइलही जप्‍त करण्‍यात आले. या प्रकरणाचा तपास दापोडी पोलीस ठाणे करीत आहे.

दिघीमध्‍ये कोयता बाळगल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

हत्यारबंदीचे आदेश असतानाही कोयता बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सव्‍वासहा वाजताच्‍या सुमारास दिघी परिसरातील पुणे आळंदी रस्‍त्‍यावर करण्‍यात आली.

गुन्‍हे शाखेच्‍या खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार ज्ञानेश्‍वर भरत कुऱ्हाडे यांनी शुक्रवारी याबाबत दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शस्‍त्र बाळगण्‍यास बंदी असतानाही आरोपीने त्‍याच्‍या ताब्‍यात ५०० रुपये किंमतीचा लोखंडी कोयता बाळगला होता. त्‍यामुळे त्‍याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.