पुणे : शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या ब्राह्मण कार्यालय संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत जनकल्याण रक्तपेढीला त्यांच्या आवश्यकतेनुसार रेफ्रिजरेटरची भेट देण्यात आली. ८०० लिटर साठवण क्षमतेचा आणि दोन अंश तापमानापर्यंत कार्यक्षम असणारा मोठा रेफ्रिजरेटर देणगी म्हणून देण्यात आला.
जनकल्याण रक्तपेढी येथे झालेल्या कार्यक्रमास ब्राह्मण कार्यालय संस्थेचे उपाध्यक्ष रमेश भागवत उपस्थित होते. रक्तपेढीच्या वतीने डॉ. अतुल कुलकर्णी यांनी संस्थेचे आभार मानले. डॉ. माधुरी बर्वे यांनी रक्तपेढीच्या कामकाजाची माहिती दिली. डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘ब्राह्मण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या नवीन रेफ्रिजरेटरमुळे रक्त साठवणुकीची क्षमता लक्षणीय वाढणार आहे. परिणामी पुणे शहरातील रक्तसाठा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. थॅलेसेमियाग्रस्त लहान मुलांना दरवर्षी चार हजार रक्तपिशव्या रक्तपेढीच्या वतीने विनामूल्य दिल्या जातात.’
भागवत म्हणाले, ‘संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जनकल्याण रक्तपेढीला त्यांची गरज ओळखून केवळ रक्तपेढीसाठी उपयुक्त रेफ्रिजरेटर देण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेलाही सुरक्षा कॅमेरा बसविण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.’