विस्मरण आणि अनुषंगिक आजारांबद्दल आजकाल ठिकठिकाणी चर्चा ऐकायला मिळते. विस्मरण म्हणजे नक्की काय, त्यासंबंधी काळजी काय घ्यावी, याबाबत उद्याच्या (२१ ऑगस्ट) ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’च्या निमित्ताने मंगला जोगळेकर यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
वयानुसार विस्मरण का होते?
विसरभोळेपणाचे अनुभव वेळोवेळी सर्व वयोगटांतील लोकांना येतात. कधी किल्ली विसरणे, बिले भरायची विसरणे, बाहेर जाताना महत्त्वाची कागदपत्रे विसरणे आदी गोष्टी होताना दिसतात. अनेकदा दमणूक किंवा कामाच्या ताणामुळेच विसरायला होते. परंतु, वाढत्या वयानुसार विस्मरण वाढते, असा सार्वत्रिक अनुभव असतो. शरीराचाच भाग असणारा मेंदू वयानुसार थकतो. मेंदूतील पेंशीची संख्या, त्यांना होणारा रक्तपुरवठा, पेशींचा एकमेकांशी संवाद या सर्वांवर वयाचा परिणाम होत असतो. त्यामुळे वयानुसार आपल्या स्मरणशक्तीची धार बोथट होते.
विस्मरणावर मात कशी करता येऊ शकते?
शरीराप्रमाणेच आपण मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष दिले, तर मेंदूचे सामर्थ्य शेवटपर्यंत टिकवणे शक्य आहे. हा विचार नवीन असला, तरी तो आपल्या समाजात रुजवणे जरुरीचे आहे. मेंदूला सक्षम कसे ठेवावे आणि स्मरणशक्ती कशी टिकवावी, याची माहिती देणारे प्रशिक्षण म्हणूनच महत्त्वाचे आहे. मेंदूच्या आरोग्याकडे लक्ष न देऊन चालण्यासारखे नाही. मुख्य म्हणजे स्वावलंबन राखायचे, तर सक्षम मेंदूची साथ हवीच. मेंदूचे आरोग्य राखण्याची सुरुवात शरीराचे आरोग्य राखण्यातून होते. ताणतणावाचे नियोजन, समाजप्रियता, मेंदूला वेळोवेळी दिलेले आव्हान, नावीन्य, कल्पकता, छंद, विविध विषयांमधील रुची या सगळ्या गोष्टी मेंदूसाठी महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर पुरेशी झोप आणि मेंदूला सुरक्षित ठेवणे हेही महत्त्वाचे आहे.
सर्वसाधारण विस्मरण आणि स्मृतिभंश किंवा डिमेन्शिया यात काय फरक आहे?
जे सामान्यपणे प्रत्येकात दिसते, ते सर्वसाधारण विस्मरण असे ढोबळ मानाने म्हणायला हरकत नाही. आपल्या विस्मरणाचे प्रसंग तुम्हाला जसेच्या तसे आठवत असतील, रोजच्या घटना स्मरणात असतील, रोज भेटणाऱ्या व्यक्तींची नावे आठवण्याबरोबरच घरी असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित करता येत असेल, तर तुमचा मेंदू ठीक आहे असे समजायला हरकत नाही. परंतु, तुम्ही तेच तेच प्रश्न पुन:पुन्हा विचारत असाल, ओळखीच्या रस्त्यांवर तुमचा गोंधळ होत असेल, काल-परवा घडलेल्या गोष्टी तुमच्या ध्यानात नसतील, लोकांमध्ये मिसळणे नको वाटत असेल, विचारांमध्ये गोंधळ दिसत असेल आणि मुख्य म्हणजे तुमच्या बाबतीतील विस्मरणाच्या घटना वाढत आहेत, असे कुटुंबीयांना वाटत असेल, त्यांना तुमच्या स्मरणशक्तीबद्दल काळजी वाटत असेल, तर आपल्या मेंदूच्या क्षमतेची खातरजमा केलेली बरी, कारण ही लक्षणे गंभीर असू शकतात.
अर्थातच सर्व लक्षणे एकाच वेळी एका व्यक्तीत दिसत नाहीत. गंभीर लक्षणांपासून सुरुवात होऊन पुढे मेंदूच्या क्षमता कमी होत जाण्याच्या आजाराला डिमेन्शिया म्हटले जाते. या आजारामुळे माणसाच्या स्वावलंबनावर मोठ्या मर्यादा येतात. त्यामुळे माणसाला नेहमीची कामेही जमत नाहीत. डिमेन्शिया झालेल्या रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक व्यक्तींना अल्झायमर्स झालेला दिसतो. व्हॅसक्युलर डिमेन्शिया म्हणजे अर्धांगवातामुळे झालेला डिमेन्शिया हा अन्य प्रकार. हृदयाचे आरोग्य संभाळून या डिमेन्शियाचे प्रमाण कमी करणे शक्य आहे.
विस्मरणाच्या प्रश्नासाठी मदत उपलब्ध आहे का?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या न्यूरॉलॉजी विभागातर्फे २०१० मध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरू करण्यात आले. याव्यतिरिक्त आम्ही ‘अल्झायमर्स सपोर्ट’ ग्रुपदेखील चालवतो. डिमेन्शियाचे रुग्ण आणि त्यांच्या काळजीवाहक कुटुंबांसाठी सर्वांगीण कार्यक्रमांतून रुग्ण, कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे ज्येष्ठांनी मेंदूचे आरोग्य जपावे, डिमेन्शियाबद्दल जागृती व्हावी म्हणून अनेक कार्यक्रम आयोजिले जातात. स्मरणवर्धिनी कार्यशाळा, विस्मरणाच्या प्रश्नांबाबत जागृती असे विविध कार्यक्रम वर्षभर राबवले जातात. याशिवाय ‘स्मार्ट सीनिअर’ कार्यक्रम, विविध तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. विस्मरणाचा आजार असेल, तर त्याचे निदान व्हावे म्हणून ‘मेमरी टेस्ट’ची सेवा मंगेशकर रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे.
shriram.oak@expressindia.com
