पुणे : ‘संस्कृत इज अमेझिंग लॅग्वेज’… ही कृतज्ञ भावना आहे ब्राझीलमध्ये प्राध्यापक असलेल्या मॅथ्यूज फ्रायमर यांची. यापूर्वी कधीही भारतातच नव्हे, तर आशिया खंडातही न आलेले मॅथ्यूज यांना संस्कृतची लागलेली गोडी आणि ती शिकून त्यात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने सुरू असलेला त्यांचा प्रवास ही कहाणी मोठी रोचक. त्याची झलक पुणेकरांना उद्या, रविवारी (१५ मार्च) मिळेल, ती मॅथ्यूज यांच्या ध्वनिमुद्रित आवाजामध्ये चार श्लोक ऐकण्याच्या अनुभवातून.

बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता करता मॅथ्यूज यांना संस्कृत भाषा शिकण्याची गरज भासली. ती शिकताना त्यातील गोडवा भावला. आणि, अवघ्या सहा महिन्यांमध्ये त्यांनी संस्कृतचा अभ्यास करून काही श्लोक मुखोद्गत केले. इतकेच नाही, तर सहा महिन्यांचा एक अभ्यासक्रम पूर्ण करून त्यात उत्तीर्ण होणाऱ्या पाचापैकी एक ते ठरले.

‘माझी मातृभाषा पोर्तुगीज. वेगळे काही शिकण्याच्या उद्देशातून मला बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची आवड लागली. मात्र, बरेचसे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. ते समजून घेण्यासाठी संस्कृत अभ्यासक्रमाचा शोध घेत असताना माझा संस्कृत सेवा फाउंडेशनशी संपर्क आला. संस्थेच्या संस्कृत भाषाभ्यासाच्या स्तर-१ म्हणजेच ‘भाषाङ्कुरः’ या अभ्यासक्रमासाठी मी प्रवेश घेतला. ऑनलाइन अभ्यासक्रम करता करता मला संस्कृत भाषेची गोडी लागली. सहा महिन्यांत मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे आत्मविश्वासही वाढला. त्यातून संस्कृतमधील ज्ञान पोर्तुगीज भाषेत अनुवादित करू शकतो, हा आत्मविश्वासही आता मला आला आहे,’ असे मॅथ्यूज फ्रायमर यांनी दूरभाष प्रणालीद्वारे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

‘मॅथ्यूज यांनी संस्कृत श्लोक योग्य पद्धतीने म्हणणे, शब्दांचे विभाजन म्हणजे पदच्छेद करणे, ही मूलभूत कौशल्ये आत्मसात केली. अभ्यासक्रमाच्या शेवटी घेण्यात आलेल्या बहुपर्यायी प्रश्नांच्या परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी ते एक आहेत,’ अशी माहिती संस्कृत सेवा फाउंडेशनचे सहसंस्थापक डाॅ. रोहन कुलकर्णी यांनी दिली.

विद्यार्थ्यांचा सत्कार उद्या

‘‘भाषाङ्कुरः’ स्तराच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा शनिवारी संस्कृतच्या ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. सरोजा भाटे, प्रा. महेश देवकर, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला ताम्रपट प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. वैदिक मंत्रांचे उच्चारण आणि मॅथ्यूज फ्रायमर या ब्राझीलच्या प्राध्यापकाने म्हटलेल्या श्लोकांच्या ध्वनिमुद्रित पठणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे,’ असे डॉ. रोहन कुलकर्णी यांनी सांगितले.