लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विकास मंडळाच्या (म्हाडा) योजनेतील सदनिका फेरवितरण पद्धतीने मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या नावे दोन लाख ७० हजारांची लाच घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. पुणे स्टेशन परिसरातील एका हॉटेलच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत व्यंकटराव जिचकार (वय ३४, रा. वाकड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) एका ६० वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली होती. आरोपी अभिजीत हा म्हाडा कार्यालयात कंत्राटी कर्मचारी आहे. तक्रारदार हे सेवानिवृत्त आहेत. म्हाडाच्या सोडतीत त्यांना सदनिका मिळाली होती. म्हाडाच्या जाहिरातीत सदनिका व्यवहारातील नेमकी किती रक्कम भरायची याबाबतची माहिती देण्यात आली नव्हती. सदनिकेची किंमत ९० लाख रुपये होती. त्यामुळे तक्रारदार सदनिका व्यवहारातील हप्ता भरलेला नव्हता. त्यामुळे सदनिका हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली होती. त्यासाठी तक्रारदार यांनी सदनिकेचे फेर वितरण होण्याबाबत आणि त्याचे चलन (आरटीजीएस) चलन मिळण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात अर्ज दिला होता.

आणखी वाचा-कल्याणीनगर अपघात प्रकरण:  अल्पवयीन मुलाची आई अटकेत

म्हाडाच्या पुणे कार्यालयातील मुख्याधिकारी अशोक पाटील आणि कंत्राटी कर्मचारी अभिजीत जिचकार यांची तक्रारदार यांनी भेट घेतली. या सदनिकेचे फेर वितरण करून आरटीजीएस चलन देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली. आरोपी जिचकार याने तक्रारदार यांच्याकडे त्यांची सदनिका पुन्हा वितरित करुन आरटीजीएस चलन काढून देण्यासाठी मुख्याधिकारी अशोक पाटील यांच्यासाठी २ लाख २० हजार रुपयांची आणि स्वत:साठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. जिचकार याने तक्रारदार यांना पुणे स्टेशन परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये बोलाविले.. शुक्रवारी रात्री हॉटेलच्या परिसरात सापळा लावून २ लाख ७० हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या जिचकार याला पकडण्यात आले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करत आहेत.