पुणे : परदेशात नोकरीच्या आमिषाने एकास साडेतीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दिव्या भटनागर-राजपूत हिच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हडपसर भागात राहायला आहेत. करोना संसर्ग काळात त्यांची नोकरी गेली होती. नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी बेस्टवे एंटरप्रायजेस कंपनीच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. दिव्या भटनागर-राजपूत असे नाव सांगणाऱ्या महिलेने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला तसेच कॅनडात नोकरीची संधी असल्याचा ई-मेल त्यांना पाठविण्यात आला होता. त्यांना बनावट नियुक्ती पत्र पाठविण्यात आले. व्हिस्सा तसेच अन्य प्रक्रियांसाठी तातडीने पैसे भरावे लागतील, अशी बतावणी तिने तक्रारदाराकडे केली.

त्यानंतर त्यांनी वेळोवेळी तीन लाख ५५ हजार रुपये भटनागरने सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यानंतर नोकरीबाबतचे पत्र मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली. चौकशीत फस‌वणूक झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जाची शहानिशा करुन या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक डमरे तपास करत आहेत.