पुणे : राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बीएस्सी नर्सिंग (परिचारिका) अभ्यासक्रमासाठी राबवण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत सात महाविद्यालयांमध्ये चक्क एकही प्रवेश झाला नसल्याचे समोर आले आहे. तर, अनेक महाविद्यालयांमध्ये एक अंकीच प्रवेश झाले असून, ५ हजार ५७३ जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर प्रवेशप्रक्रिया राबवण्यात आली. या प्रवेशप्रक्रियेअंतर्गत झालेल्या प्रवेशांची आकडेवारी सीईटी सेलने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नर्सिंग अभ्यासक्रमासाठी राज्यात शासकीय, खासगी अशा एकूण २९४ महाविद्यालयांमध्ये १६ हजार ५३० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १० हजार ९५७ जागांवर प्रवेश झाले. त्यापैकी शासकीय महाविद्यालयांतील १ हजार १८० जागांपैकी १ हजार १७४ जागांवर प्रवेश होऊन सहा जागा रिक्त राहिल्या. तर, खासगी महाविद्यालयांतील १५ हजार ३५० जागांपैकी ९ हजार ७८३ जागांवर प्रवेश झाले असून, ५ हजार ५६७ जागा रिक्त राहिल्याचे दिसून येत आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण सात महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश झाले. त्यात बीड, नाशिक, नांदेड, यवतमाळ, ठाणे येथील प्रत्येकी एका महाविद्यालयाचा समावेश आहे. तर ४७ महाविद्यालयांमध्ये १० प्रवेशही झाले नाहीत. ४४ महाविद्यालयांमध्ये २० टक्केही प्रवेश झाले नाहीत. २०२३-२४मध्ये राज्यात १८३ परिचारिका महाविद्यालये, ९ हजार ३३० जागा उपलब्ध होत्या. तर २०२२४-२५मध्ये ११ हजार २८० जागांसाठी, तर यंदा १६ हजार ५३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती.

केवळ तीन वर्षांत १११ नव्या महाविद्यालयांची भर पडल्याने जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी, मागणीपेक्षा जास्त जागा निर्माण झाल्याचा फटका प्रवेशांना बसला आहे. तसेच, शासकीय महाविद्यालयांच्या तुलनेत खासगी महाविद्यालयांतील रिक्त जागांचा टक्का जास्त असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची मागणी, नवीन महाविद्यालये या बाबत विचार करावा लागणार असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

पूर्वी नर्सिंग महाविद्यालयांची संख्या कमी होती. मात्र, आता महाविद्यालयांची संख्या वाढल्याने जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. जागा रिक्त राहू नयेत, यासाठी पात्रता गुण (पर्सेंटाइल) कमी करणे, नव्या महाविद्यालयांना मान्यता न देणे असे उपाय करावे लागतील. – डॉ. मिलिंद निकुंभ, माजी प्र कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ