पुणे : आषाढी वारीत दर वर्षी लाखो वारकरी सहभाग होतात. या वारकऱ्यांना अर्थसाक्षरतेचे धडे देण्याचे पाऊल मुंबई शेअर बाजाराने यंदा प्रथमच उचलले. पुण्यात वारीदरम्यान सहा ठिकाणी वारकऱ्यांसाठी अर्थसाक्षरतेचा उपक्रम राबविण्यात आला. त्यात वित्तीय नियोजनासह डिजिटल फसवणूक, सायबर सुरक्षा, गुंतवणुकीबद्दल वारकऱ्यांना सजग करण्यात आले. या निमित्ताने यातील फायदे आणि तोटे वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमाचा उद्देश आर्थिक साक्षरता, आर्थिक फसवणूक, सायबर सुरक्षा आणि योग्य गुंतवणूक करण्याची जागरूकता निर्माण करणे हा होता. आषाढी वारीत सुमारे सहा ते आठ लाख वारकरी या मार्गावरून जातात. त्यामुळे वारकऱ्यांसह आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गुंतवणूक जनजागृती संदेश पोहोचवण्याची ही अनोखी संधी ठरली. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांपर्यंत आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक जनजागृती पोहोचवण्यावर भर देण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाला अर्थसाक्षर करून त्याला मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचा उद्देश यामागे होता.

भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. मुंबई शेअर बाजाराच्या गुंतवणूक संरक्षण निधीने म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना ॲम्फीच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले. पुण्यात वारीदरम्यान ९ व १० जुलैला सहा ठिकाणी याअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सेबीचे कार्यकारी संचालक सुनील कदम, मुख्य सरव्यवस्थापक विकास एस.एस., उपसरव्यवस्थापक बाला कुमारी आणि सहायक सरव्यवस्थापक राहुल केलापुरे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी गुंतवणूक जनजागृती व आर्थिक साक्षरता उपक्रम अधिक मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले.

फसवणूक टाळण्यावर भर

देशभरात डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, ते दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार होत आहेत. ग्रामीण भागातही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी काय करावे, यासाठीच्या अतिशय सोप्या गोष्टी वारकऱ्यांना सांगण्यात आल्या.

पथनाट्यांद्वारे जनजागृती

आषाढी वारीत वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध पथनाट्ये सादर करण्यात आली. या माध्यमातून सायबर फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, डिजिटल सुरक्षा आणि योग्य गुंतवणूक याबाबत महत्त्वाचे संदेश सोप्या पद्धतीने देण्यात आले. गुंतागुंतीचे आर्थिक विषय सहज आणि आकर्षक पद्धतीने मांडल्यामुळे या पथनाट्यांना वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.