बीएसएफचे जवान प्रसाद प्रकाश बेंद्रे (वय २७) यांचे शनिवारी इंफाळ येथे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज (रविवार) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर त्यांच्या मागे आई, पत्नी आणि चार बहिणी असा परिवार आहे.

पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथील पंचमुखी मारुती मंदिरासमोर प्रसाद प्रकाश बेंद्रे हे राहण्यास होते. सात वर्षांपूर्वी प्रसाद बेंद्रे हे बीएसएफमध्ये रुजू झाले होते. त्या वेळी त्याची नियुक्ती जम्मू काश्मीर आणि नंतर मणिपूर येथे करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती पुण्यातील शिवाजी नगर गावठाण भागात समजातच सर्व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

पोलीस वसाहतीतील हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर मॉडर्न हायस्कुलमध्ये पुढील शिक्षण झाले. बारावीनंतर ते बीएसएफच्या १८२ व्या तुकडीत दाखल झाले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत ते श्रीनगरमध्ये कार्यरत होते. नुकतीच त्यांची मणिपूर, इम्फाळ येथील चीन सीमेवर बदली झाली. गणपतीत ते पुण्यात आले होते. हीच त्यांची अखेरची भेट ठरली.
आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रसाद बेंद्रे यांचे पार्थिव शिवाजीनगर गावठाण येथे आणल्यानंतर साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. साडे अकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रसाद बेंद्रे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी समाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावली होती. अमर रहे अमर रहे प्रसाद बेंद्रे अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.