पुणे : सरकारी मालकीच्या ‘बीएसएनएल’ने आता बड्या दूरसंचार कंपन्यांना टक्कर देण्याचे पाऊल उचलले आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील ग्राहकांपर्यंत दूरसंचार सेवा पोहोचवण्याचे मोठे पाऊल ‘बीएसएनएल’ने उचलले आहे. राज्यातील दुर्गम भाग अद्याप दूरसंचार सेवेपासून वंचित आहे. अशा भागापर्यंत फोर जी सेवा पोहोचविण्याचे काम बीएसएनएलने सुरू केले आहे. ‘बीएसएनएल’ने दुर्गम भागात नवीन टॉवरची उभारणी केली असून, आगामी काळात आणखी टॉवर उभारले जाणार आहेत. यामुळे आतापर्यंत दूरसंचार सेवा नसलेली दुर्गम ठिकाणे या सेवेशी जोडली जात आहेत.

अनेक दुर्गम भागांमध्ये आजही दूरसंचार सेवा उपलब्ध नाही. या भागातील रहिवासी बाहेरच्या जगाशी दूरध्वनी अथवा मोबाइलवरून संपर्क साधू शकत नाहीत. हे नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधींकडे दूरसंचार सेवेच्या जाळ्याबाबत मागणी करतात. त्यानंतर लोकप्रतिनिधींकडून दूरसंचार विभागाकडे त्या भागातील सेवेबद्दल विनंती केली जाते. दूरसंचार विभागाकडून याआधारे त्या भागात दूरसंचार सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले जातात. त्यामुळे दूरसंचार सेवा न पोहोचलेल्या वाड्या आणि वस्त्यांमध्ये आता मोबाइल सेवा पोहोचू लागली आहे.

केवळ चार ते पाच रहिवाशांसाठीही सुविधा

या विषयी ‘बीएसएनएल’चे प्रधान सरव्यवस्थापक (व्यापार क्षेत्र) अतुल वाखले म्हणाले, ‘दुर्गम भागातील वाड्या, वस्त्यांच्या ठिकाणी अगदी चार ते पाच जण राहत असतील, अशा ठिकाणांपर्यंत आम्ही दूरसंचार सेवा पोहोचवत आहोत. पुणे जिल्ह्यात दुर्गम भागात ९५ दूरसंचार टॉवर उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील ७० टॉवरची उभारणी पूर्ण झाली आहे. उर्वरित टॉवर उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. या टॉवरच्या माध्यमातून नागरिकांना सध्या फोर जी सेवा मिळत आहे. लवकरच फाइव्ह जी सेवा सुरू करण्यात येणार आहे.’

रस्तेखोदाईमुळे समस्या

‘पुणे शहरात ठिकठिकाणी रस्तेखोदाईचे सुरू आहे. त्यामुळे वारंवार ‘बीएसएनएल’च्या वाहिन्या तुटून सेवा ठप्प होते. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे महापालिका आणि इतर यंत्रणांशी समन्वय साधून या समस्येवर तोडगा काढला जात आहे. रस्तेखोदाई करताना बीएसएनएलच्या वाहिन्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांना सूचना करण्यात आलेल्या आहेत,’ असे वाखले यांनी सांगितले.

‘बीएसएनएल’ची टॉवर उभारणी

आंबेगाव – १२

भोर – ७

जुन्नर – १

खेड – १२

मावळ – ५

मुळशी – २

पुरंदर – ११

वेल्हा – २०

ग्राहक संख्येत वाढीचा अंदाज

पुणे विभागात ‘बीएसएनएल’ची फोर जी सेवा सुरू झालेली आहे. सध्या फाइव्ह-जी सेवेची चाचणी सुरू आहे. ही सेवा वर्षअखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर ‘बीएसएनएल’च्या ग्राहकांच्या संख्येत वर्षाला १० ते २० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती ‘बीएसएनएल’चे प्रधान सरव्यवस्थापक अतुल वाखले यांनी दिली.