पिंपरी : निगडी प्राधिकरणातील बीएसएनएलच्या भूमिगत डक्टमध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. हे दोघे केबल चोरीसाठी डक्टमध्ये उतरल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची पोलिसांकडून पडताळणी केली जात असून, हिंगोलीतून तिघांना ताब्यात घेतले आहे.
निगडी प्राधिकरणातील बीएसएनएलच्या डक्टमध्ये दोन तरुण मृतावस्थेत आढळले होते. मनोज शिंदे आणि अमोल शिंदे अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर पोलिसांनी मृत तरुणांसोबत असलेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला. दुर्घटनेच्या वेळी आणखी तिघे जण तेथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, घटना घडताच त्यांनी पळ काढला होता. पोलिसांनी तिघांना हिंगोली येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. त्या वेळी बीएसएनएल डक्टमध्ये जाण्यामागे केबल चोरीचा उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत मनोज शिंदे यानेच इतरांना निगडी येथे बोलावले होते, अशी प्राथमिक माहितीही तपासात पुढे आली आहे.
भूमिगत डक्टमध्ये असलेली तांब्याची केबल कापून ती विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, डक्टमध्ये उतरल्यानंतर दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर सोबत असलेले तिघे घटनास्थळावरून पसार झाले होते. दरम्यान, या घटनेनंतर बीएसएनएल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही अधिकृत काम सुरू नसल्याचे स्पष्ट केले होते.
ताब्यात घेतलेल्या तिघांनी प्राथमिक चौकशीत केबल चोरीच्या उद्देशाने डक्टमध्ये गेल्याची माहिती दिली आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे. त्यांचा नेमका उद्देश आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी सांगितले.
या दोन मृत तरुणांसोबत असलेल्या तिघांना पोलिसांनी हिंगोली येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत मनोज यांनी आम्हाला बोलविले होते. आम्हाला प्रत्येकी ५०० रूपये देऊन केबल चोरीसाठी त्याठिकाणी नेल्याचे सांगितले आहे, अशी माहिती निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली. मात्र, अधिक चौकशी करून हे तिघे नेमके चोरीसाठीच तेथे गेले होते का ? की अन्य काही कारण आहे, याबाबत तपास केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
