पुणे : भारतीय दूरसंचार विभागाची (बीएसएनएल) केबल चोरीला गेल्याची घटना कोथरूड भागात घडली. केबल चोरीला गेल्यानंतर कोथरूड भागताील दूरध्वनी सेवा काही विस्कळीत झाली.
याबाबत कैलास माधवराव पायमोडे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायमोडे हे एरंडवणे भागातील बीएसएनएल कार्यालयात मंडल उपअभियंता आहेत. देखभाल दुरुस्ती करणाऱ्या बीएसएनएलमधील कर्मचाऱ्यांनी कर्वे पुतळा चौकातील जेली फिल्ड काॅपर केबल तुटल्याचे पाहिले.
ही केबल तुटल्यामुळे या भागताील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. कोथरूडमधील मृत्यूंजय मंदिर चौकातील बीएसएनलच्या भूमिगत केबलची तपासणी केली. तेव्हा डक्टमधील केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले, असे मंडल उपअभियंता पायमोडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी कोथरूडमधील कर्वे पुतळा परिसरातून केबली चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अलंकार पोलिसांनी चोरट्यांना अटक केली. अटक करण्यात आलेले चोरटे मूळचे उत्तर प्रदेशातील होते. त्यांच्याकडून टेम्पोसह केबल जप्त करण्यात आली होती.
खासगी कंपनीतून तांब्याची तार चोरी
हडपसरमधील एका खासगी कंपनीच्या आवरातून दोन लाखांची तांब्याची तार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत बापू ज्ञानदेव माने (वय ४४, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. माने हे खासगी कंपनीत सुरक्षारक्षक आहेत. हडपसरमधील माळवाडी परिसरात खासगी कंपनी आहे. २ मे रोजी कंपनीच्या आवराात चोरटे शिरले. चोरट्यांनी दोन लाख २० हजारांची तांब्याची तार चोरून नेली. पोलीस कर्मचारी खटके तपास करत आहेत.
