पिंपरी : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या फायबर ऑप्टिकल ‘डक्ट’मध्ये उतरलेल्या दोघांचा मृत्यू झाला. श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. निगडी, प्राधिकरणात बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. मागीलवर्षी याच डक्टमध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत या डक्टमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मनोज बाबुराव शिंदे (वय २६), अमोल अशोक शिंदे (वय १९, दोघेही रा. सिद्धेश्वर, औंढा, हिंगोली) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बानसोडे यांनी याबाबत माहिती दिली. ऑप्टिक फायबरसाठी बीएसएनएलचे शहरात ठिकठिकाणी दहा बाय दहाच्या चौकोनी आकाराचे डक्ट आहेत. निगडी, प्राधिकरणातील डक्टमध्ये मनोज आणि अमोल हे बुधवारी उतरले होते. अग्निशमन विभागाच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दोघे कशासाठी आले होते, त्यांना कोणी आणि काय काम सांगितले होते, याबाबतचा तपास सुरु आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडेही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह नातेवाईकांकडे सूपूर्द केले असून त्यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डक्टने घेतला पाच जणांचा बळी

निगडी परिसरातील याच डक्टमध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजी तिघांचा मृत्यू झाला होता. लखन धावरे (वय ३५), दत्तात्रय व्हनाळे (वय ३८, दोघे रा. चिंचवड, मूळ धाराशिव), साहेबराव गीरशेटे (वय ३५, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ चंद्रपूर) या तिघांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला होता. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या डक्टमध्ये आतापर्यंतच पाच जणांचा मृत्यू झाल्याचेही पोलीस निरीक्षक बनसोडे यांनी सांगितले.

याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यू झालेले दोघे कोणाकडे काम करित होते, त्यांना तिथे कोणी पाठविले होते, याबाबत तपास सुरु आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडेही तपास केला जात आहे. तपासाअंती पुढील कार्यवाही केली जाईल, असे निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले.