पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड ते नऱ्हे या दरम्यान वाहतूक कोंडीमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी या मार्गालगत ध्वनी नियंत्रित भिंती उभाराव्यात किंवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत वाहतूक कोंडी आणि त्यातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा रहिवाशांना होणारा त्रासाचा मुद्दा पुढे आणला आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक, बावधन आणि लगतच्या भागातील रहिवासी वाहतुकीमुळे होणाऱ्या उच्च ध्वनिप्रदूषणामुळे त्रस्त आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुण्यातील महामार्गावर वाकड ते नऱ्हे या मार्गावर ध्वनी नियंत्रित भिंत उभारावी, अशी विनंती गृहनिर्माण संस्था आणि विविध संस्थांनी केली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. हेही वाचा - पुणे : अनैतिक संबंधातून दीड वर्षांच्या बालकाचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप हेही वाचा - पुणे: शिक्षण विभागात अधिकारी पदावर आता प्रतिनियुक्तीने नेमणूक; शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपूर्वी पुढे आला होता. राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातील पूलही पाडण्यात आला होता. त्यातच आता वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा समोर आला आहे.