scorecardresearch

पुण्यात मांजरीच्या सरपंचावर गोळीबार; दगड, विटांनीही मारहाण

पुण्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून हडपसर भागातील मांजरीच्या सरपंचांवर गोळीबार करण्यात आला.

पुण्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून हडपसर भागातील मांजरीच्या सरपंचांवर गोळीबार करण्यात आला. त्यांना दगड, विटांनी देखील मारहाण करण्यात आली. यात सरपंच जखमी झाले आहेत. पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर असं मांजरीच्या सरपंचांचं नाव आहे.

धारवाडकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन मित्रांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम धारवाडकर हे काही जणांसह रात्री श्रीराम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडणे झाले. धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता.

आरोपीने फोन करुन साथीदारांना बोलावले

भांडणानंतर आरोपी घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण मोपेडवरुन तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. ती गोळी धारवाडकर यांना लागली नाही. त्यानंतर त्यांनी तेथे पडलेल्या दगड, विटांनी धारवाडकर यांना मारहाण केली.

दगड डोक्यात घातल्याने सरपंच धारवाडकर जबर जखमी

दगड डोक्यात घातल्याने त्यात सरपंच धारवाडकर जबर जखमी झाले. त्यानंतर आरोपी तेथे जमलेल्यां लोकांना धमकावून पळून गेले. लोकांनी धारवाडकर यांना तातडीने नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 

हेही वाचा : पुणे : तोतया पत्रकाराचा पोलीस चौकीत गोंधळ, कारवाई करणाऱ्या पोलिसांना धमकी; आरोपीला अटक

याबाबत अण्णा धारवाडकर यांनी सांगितले की, या भांडणाशी आपला काही संबंध नव्हता. चंद्रकात घुले व नंदू शेडगे हे ओळखीचे असून त्यांच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीमुळे डोक्याला जखम झाली आहे. डॉक्टरांनी ८ ते ९ टाके घातले आहे. हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bullet firing on sarpanch of manjari in pune print news pbs

ताज्या बातम्या