पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांच्या कार्यलायामध्ये आज एक खळबळजनक प्रकार घडला. त्यांच्या अँटी चेंबरमध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल आढळून आले, एक व्यक्तीने हे बंडल ठेवून तो तिथून निघून गेल्याचे समोर आले आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “एक मास्कधारक व्यक्ती माझ्याकडे आला होता व त्याने सांगितले की दलित वस्तीची कामे मंजूर करायची आहेत. मी त्यांना सांगितले की तुमचा प्रस्ताव योग्य असेल तर तो मंजूर होईल. त्यांना हे देखील सांगितलं की आमचे संबंधित निरीक्षक जे आहेत ते सध्या अॅडमीट आहेत. त्या आले की तुमचा प्रस्ताव पुढे पाठवला जाईल. त्यावर त्यांनी काही ऑफर ठेवण्याचा देखील प्रयत्न केला. मी त्यांना सांगितले की, कुणलाही तुम्ही एक पैसा देण्याची गरज नाही. तुमचे काम योग्य असतील, तर सहज मंजूर होतील. तो व्यक्ती अँटी चेंबरला गेला, त्यामुळे मला ते संशायस्पद वाटलं. दुसऱ्या निरीक्षकास मी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की यांची जी फाईल आहे ती तत्काळ मांडा आणि नियमानुसार असतील तर मंजूरीसाठी सादर करा. पण त्या व्यक्तीची हालचाल जरा संशायास्पद वाटली. दरम्यान माझी देखील अन्य ठिकाणी बैठक असल्यामुळे मी निघून गेलो. त्याने पैसे ठेवले की नाही हे देखील मला माहिती नव्हतं. परंतु त्यांची हालचाल संशायास्पद होती. त्यांनी पैसे वैगरे फेकले असं काही घडलं नाही, पैसे किती देतो असं देखील काहीही बोलेलं नाही. ती व्यक्ती कुठे आहे याबाबत मला काहीच माहिती नाही.”

तर, या सर्व प्रकाराबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील माध्यमांना माहिती दिली आहे. ”समाजकल्याण अधिकारी हे आज बाहेर एका बैठकीसाठी गेले होते. तेव्हा आम्हाला अशी माहिती समजली की त्यांच्या कक्षात पैशांचे बंडल दिसून आले. यावर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आम्हाला सांगिते की मी सध्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आय़ुक्तांकडे बैठकीसाठी आलेलो आहे. त्यानंतर ते जेव्हा स्वतः कार्यलयात आले, त्यांच्या अँटी चेंबरमध्ये काही पाचशेच्या नोटा आढळून आल्या. यावर त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावलं, शिवाय माध्यमप्रतिनिधी देखील पोहचले. प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की त्यांना बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी असं करण्यात आलं होतं. यावर त्यांनी व अन्य अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधला. आता पोलीस याबाबत चौकशी करून अहवाल देतील.” अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.