पुणे : आर्थिक फसवणुकीमुळे व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.रमजान अली साचे (वय ४४, रा. भवानी पेठ) हे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत रमजान यांच्या पत्नीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुनील बेले, अफसर शेख, मतीन शेख, हैदर शेख, असिफ, मुजम्मिल पटवेकर, संजीव बजारमठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साचे यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. त्यांची पत्नी एका शाळेत शिक्षिका आहे. रमजान यांना गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून ५० लाख रुपये उकळले. त्यासाठी त्यांनी बँकेचे कर्जही घेतले होते. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी त्यांना नकार दिला. आरोपींनी त्यांना त्रास दिल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुरुवातीला याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. रमजान यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर तपास करत आहेत.