अमेरिकेतील क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनात भागीदारी हक्क मिळवून देण्याच्या आमिषाने कोथरुड भागातील एका व्यावसायिकाची ५५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी मुंबईतील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>>पुणे : आदिवासी समाजजीवनावर संशोधन करण्याची संधी; अर्जांसाठी २६ नोव्हेंबरची मुदत
या प्रकरणी सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशिद खान, सिराज हुसेन, विक्रम चौधरी (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक कोथरुड भागात राहायला असून त्यांचे कार्यालय तेथे आहे. आरोपी पांडे, कृष्णा, खान, हुसेन, चौधरी यांच्याशी आरोपीची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. यूएसए क्रिकेट कौन्सिलकडे २०-२० प्रकारात क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. या स्पर्धेस परवानगी मिळाल्यानंतर ४० टक्के भागीदारी हक्क मिळवून देतो, असे आमिष आरोपींनी व्यावसायिकाला दाखविले होते. त्यानंतर व्यावसायिकाकडून आरोपींनी वेळोवेळी ५५ लाख रुपये घेतले. दरम्यान, स्पर्धेबाबत तक्रारादाराने विचारणा केल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सपताळे तपास करत आहेत.