लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मीठ हा मानवाच्या आहारातील अविभाज्य घटक आहे, मात्र, या मिठाचा आहारातील अतिरेक कित्येक आजारांना निमंत्रण देणारा असून मिठाचे अतिरिक्त सेवन टाळल्यास २०३० पर्यंत जगातील ७० लाख जीव वाचवणे शक्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून आहारातील मिठाच्या सेवनाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या आहारात अतिरिक्त मीठ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हृदयरोग, पक्षाघातासारखे आजार आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर जगातील सुमारे ७३ टक्के लोकसंख्येचे मीठ सेवन नियंत्रणात आणण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. सोडियम हा एक महत्त्वाचा पोषक घटक आहे, खाण्याच्या मिठातून तो शरीराला मिळतो, मात्र त्याचे सेवन प्रमाणात असणेच हिताचे आहे. विविध देशांतील मीठ सेवनाचे प्रमाण तपासण्यासाठी प्रत्येक देशाचा मीठ सेवन तक्ता (सोडियम स्कोअर कार्ड) तयार केला असून हे सेवन नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केल्या आहेत.
आणखी वाचा-पुणे: तरुणीने प्रेमाचे नाटक करुन पाच लाख रुपये उकळले, तरुणाची आत्महत्या
सोडियम नियंत्रण कसे करावे?
- नियंत्रित मीठ असलेल्या पदार्थ सेवनाला प्रोत्साहन देणे.
- सार्वजनिक संस्थांतील आहारातील मीठ नियंत्रणासाठी धोरण निश्चित करणे.
- अतिरिक्त मीठ आणि दुष्परिणाम यांबाबत जनजागृती करणे.
आहारात किती मीठ योग्य?
दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मिठाचे सेवन हे प्रकृतीसाठी योग्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगते. प्रत्यक्षात हे प्रमाण दररोज १०.८ ग्रॅम एवढे आहे. अतिरिक्त मिठाचे सेवन हे कित्येक असंसर्गजन्य आजारांना निमंत्रण देते. यांमध्ये लठ्ठपणा, कर्करोग, अस्थिरोग, मूत्रपिंडाचे विकार यांचा धोका समाविष्ट आहे. आहारातील मिठाचा अतिरेक टाळण्यासाठी प्रक्रिया केलेले पाकीटबंद पदार्थ खाऊ नयेत. पाकीटबंद पदार्थ खाणे अनिवार्य असेल त्या वेळी त्यावर छापलेली पोषण मूल्य विषयक माहिती तपासून त्यात अतिरिक्त मीठ नाही, याची खात्री करा. स्वयंपाक करताना वापरलेल्या मिठापेक्षा जास्त मीठ जेवताना वरून वाढून घेऊ नये. फळे, सॅलड खाताना त्यांवर मीठ घेणे बंद करावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.