हिरवा कोपरा : काटेरी कॅक्टस, सजल सक्युलंट्स

शोभिवंत दगड व विविध प्रकारची कॅक्टस लावून बागेतला एखादा कोपरा छान सजवता येतो.

Cactus Plants
एखाद्या कोपऱ्यात अगदी टेबलावरसुद्धा कॅक्टस शोभून दिसते.

वैराण, ओसाड प्रदेशात प्रवास करताना, रस्त्याच्या कडेला अचानक आकर्षक लालभडक फुले आपले लक्ष वेधून घेतात. जवळ जाताच लक्षात येते, अरे हा तर निवडुंग. ही फुलेच नाही तर निवडुंगाच्या झाडाचा आकारही आकर्षक असतो. उष्ण, रखरखीत, कोरडय़ा हवामानात, निकृष्ट जमिनीत, वाळवंटी प्रदेशात, महिनोन महिने पाण्याच्या थेंबाशिवाय तग धरू शकणारे निवडुंग हा निसर्गातल्या विविधतेचा चमत्कारच. पाण्याशिवाय जगणे हे यांचे वैशिष्टय़. वाळवंट हीच मातृभूमी. कॅक्टसी कुटुंबाच्या आकारामध्ये प्रचंड विविधता आहे. याच्या खोडाचे विविध आकार आपल्याला मोहात पाडतात. महाकाय, उंच निवडुंगापासून अंगठय़ाएवढय़ा छोटय़ा आकाराचे निवडुंग बघायला मिळतात. कधी हाताच्या पंजासारखा आकार तर कधी उंच निमुळत्या काठीचा आकार, कधी गोल बॅरलसारखा तर कधी बाटलीसारखा आकार. वाळवंटी प्रदेशात अनुसरून खोडं जाड, मांसल झाली, तर पानांची जागा काटय़ांनी घेतली. या काटय़ांची विविधता म्हणजे निसर्गाचा आणखी एक चमत्कार. हे काटे कधी कापूस पिंजून टाकण्यासारखे, कधी बर्फ भुरभुरल्यासारखे, कधी मखमली सोनेरी ठिपक्यांसारखे तर कधी तीक्ष्ण सुयांसारखे. या काटय़ांचे सौंदर्य आपल्याला मोहात पाडते, अन एखादे तरी कॅक्टस आपल्या बागेत असावे असे आपल्याला वाटते. रोपवाटिकेतून याचे रोप आणल्यावर छोटय़ा कुंडीत वाळूचा चाळ, माती अथवा विटांचा चुरा, माती भरून रोप लावावे. पाणी अगदी कमी लागत असल्याने, पाण्याचा नीट निचरा होणे गरजेचे असते.एकदा कुंडीत लावल्यावर निवडुंगास अजिबात देखभाल लागत नाही. ऊन मात्र आवडते. शोभिवंत दगड व विविध प्रकारची कॅक्टस लावून बागेतला एखादा कोपरा छान सजवता येतो. कॅक्टस प्रजाती कुटुंबवत्सल आहे. त्यामुळे मूळ रोपास असंख्य पिल्ले येत राहतात. हे एकत्र कुटुंब सुंदर दिसते, पण कुंडीत फार गर्दी झाल्यास अथवा खूप उंच वाढल्यास तुकडा अलगद काढून दुसरे रोप करता येते. निवडुंग हाताळताना हातात मोजे घालावेत. काटय़ांच्या एखाद्या ठिपक्यात असंख्य काटे असतात. ज्यामुळे हाताची आग होणे,खाज सुटणे असा त्रास होऊ शकतो.

अगदी छोटय़ा बाल्कनीत कोनाडय़ात, एखाद्या कोपऱ्यात अगदी टेबलावरसुद्धा कॅक्टस शोभून दिसते. मोठी जागा, फार्म हाऊस यासारख्या ठिकाणी फडय़ा निवडुंग फेरी कॅसल हे रानोमाळ दिसणारे निवडुंग कुंपणापाशी लावता येतात. तर झेब्रा कॅक्टस वनी इयर्स छोटय़ाशा कपातही छान रहाते.

[jwplayer hxATNALn]

कॅक्टसप्रमाणेच कमी पाण्यावर वाढणारे, घरातही छान राहणारे, पानापानात पाणी साठवणारे सक्युलंट्स घराची व बागेची शोभा वाढवतात. मोठय़ा पसरट कुंडीत, पोर्सलीनच्या ट्रेमध्ये, टेराकोटाच्या विविध आकाराच्या कुंडय़ांमध्ये सक्युलंट्स लावून घरात ठेवता येतात. कुंडीतून पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्यावी. मातीत विटांचा चुरा घालावा म्हणजे माती गच्च होणार नाही. जास्त पाण्याने सक्युलंट्स कुजतात. यांच्या आकारात, पानांच्या रचनेत, पानांच्या आकारात विविधता आढळते. फुलेसुद्धा कधी गुच्छात येतात तर कधी लांब दांडीला नाजूक घंटा लटकतात. सक्युलंट्समध्ये जेड लोकप्रिय आहे. नाजूक, गोलसर, मांसल पानाचा जाडसर खोडाचे जेड बोनसायसाठी वापरता येते. बोटाएवढय़ा जाडीच्या चार-पाच इंचाच्या काडय़ा खोचून नवीन रोपं करता येतात. याला फार दिवस सावलीत ठेवू नका. शोभेसाठी घरात आणलेत तर थोडा काळ तग धरेल नंतर पाने गाळायला लागेल. नाजूक कळ्यांसारखी पाने असलेली डाँकी टेल सक्युलंट्स झुंबरासाठी वापरता येतात. कमळासारखी दिसणारी, पंजासारखी फताडी पाने असलेली सक्युलंट्स सुंदर दिसतात. याची जुने पाने काढून मातीवर पसरून त्यावर दोन आठवडे पाणी शिंपडल्यास त्या पानांना मुळे फुटून नवीन रोपं तयार होतात. कॅक्टसप्रमाणे यास खोडावर पिल्ले येतात. ती वेगळी करून नवीन रोपं करता येतात. जमिनीतून कमीत कमी पाणी घेणारी आपल्या परिचयाची कोरफड, पानापानात पाण्याची पारदर्शक जेली साठवते. ही कुमारी आपल्या सौंदर्यवर्धनासाठी वरदानच आहे. कोरफडीचा हा गर त्वचेस, केसास लावता येतो. कॅक्टस व सक्युलंट्स म्हणजे विविधतेचा खजिनाच. काय काय निवडायचे हे ठरवणे अवघडच. त्यामुळे काही जण यांचेच विविध प्रकार गोळा करून बाग सजवतात. कारण ते काटेरी कॅक्टस अन् सजल सक्युलंट्सच्या प्रेमात बुडालेले असतात!

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cactus plants in house