पुणे : ‘अणुऊर्जेबाबत आपण संपूर्ण काळजी घेतली पाहिजे. मात्र, त्याबद्दल अनावश्यक भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही,’ असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि ‘कल्पक्कम’ येथील ‘इंदिरा गांधी परमाणु अनुसंधान केंद्रा’तील (आयजीसीएआर) मुख्य अभियंते रवींद्र काळे यांनी व्यक्त केले. ‘हिरोशिमा-नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्याने जगाला अणुऊर्जेची ओळख करून दिली. त्या काळात अणुऊर्जेच्या उपयुक्ततेबद्दल कोणालाही माहिती नव्हती. त्यामुळे तिचा वापर अत्यंत विनाशकारी उद्देशांसाठी केला गेला. त्याच रूपात अणुऊर्जा सर्वसामान्यांच्या मनात राहिली. त्यामुळे आजही अणुऊर्जा म्हणजे खूप धोकादायक, अशी भीती समाजात दिसते. हा गैरसमज लोकांच्या मनातून काढणे कठीण आहे,’ असेही काळे यांनी नमूद केले.
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रवींद्र काळे बोलत होते. संस्थेचे डॉ. गिरीश मुंदडा, हर्षवर्धन देवकाते, राजेंद्र माहुलकर, ‘बडोदा मित्र मंडळा’चे अध्यक्ष डॉ. जयसिंग पाटील आदी या वेळी उपस्थित होते. रवींद्र काळे म्हणाले, ‘एक किलो कोळशापासून दोन युनिट आणि एक किलो तेलापासून किंवा गॅसपासून सुमारे चार युनिट वीज निर्माण होऊ शकते. मात्र, एक किलो नैसर्गिक युरेनियमपासून ५० हजार युनिट वीज निर्माण करता येते. जगात एकूण सुमारे ४४० अणुऊर्जा प्रकल्प आहेत. त्यांपैकी १०० हून अधिक अमेरिकेत आहेत. उत्तर अमेरिका, कॅनडा, पश्चिम युरोप, रशिया, दक्षिण कोरिया, चीन आणि जपानमध्ये अणुऊर्जा प्रकल्पांची संख्या मोठी आहे.’
‘देशातील अणुऊर्जा प्रकल्पांना गती’
‘इंग्लंड आणि फ्रान्समध्ये युरेनियमच्या खाणी नाहीत. फ्रान्सला पश्चिम आफ्रिकेतील गॅबॉनमधील खाणींतून युरेनियम मिळते. फ्रान्समध्ये निर्माण होणारी ७६ टक्के वीज अणुऊर्जेद्वारे तयार केली जाते. आपल्या देशात सध्या २५ ते २६ रिॲक्टर्स वेगवेगळ्या क्षमतेने काम करत आहेत. ‘प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर’ (पीएचडब्ल्यूआर) हा भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचा मुख्य कणा आहे. आता आपल्या देशाला ऑस्ट्रेलियाकडून नैसर्गिक युरेनियम मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाकडे नैसर्गिक युरेनियमचा मोठा साठा आहे,’ असेही काळे यांनी नमूद केले.
‘कल्पक्कम’चे वैशिष्ट्य काय?
‘युरेनियम-२३५, प्लुटोनियम आणि युरेनियम-२३३ (थोरियमपासून तयार केलेले) या तिन्हींचा वापर करून अणुऊर्जा निर्मिती होत असलेले ‘कल्पक्कम’ हा जगातील एकमेव अणुऊर्जा प्रकल्प आहे. ‘फास्ट ब्रीडर रिॲक्टर’मध्ये द्रव सोडियम कूलंट म्हणून वापरले जाते. सोडियमची औष्णिक वहन क्षमता अत्यंत उच्च असते. ते न्यूट्रॉन्सचा वेग कमी करत नाही आणि त्याच्या प्रवाहात पाण्यापेक्षा कमी घर्षण असते. या द्रव सोडियमसाठी लागणाऱ्या विशेष ‘व्हर्टिकल पंपा’ची निर्मिती ‘आयजीसीएआर’ ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’च्या मदतीने संपूर्णपणे भारतात केली आहे,’ अशी माहिती रवींद्र काळे यांनी दिली.
‘चेर्नोबिल’मध्ये काय झाले?
‘न्यूक्लियर रिॲक्टर हा अणुबॉम्बसारखा काम करत नाही. रिॲक्टरमध्ये अतिशय विरळ केलेले इंधन (डायल्युट फ्युअल) वापरले जाते. ते गरम होऊ शकते किंवा वितळू शकते; मात्र त्याचा बॉम्ब बनणे अशक्य आहे. बॉम्ब बनण्याची क्रिया पूर्णपणे वेगळी असते,’ असेही काळे यांनी सांगितले. ते म्हणाले,‘युक्रेनमधील चेर्नोबिल येथे झालेला अपघात हा अणुस्फोट नव्हता. चेर्नोबिलच्या प्रकल्पात एक हजार मेगावॉटच्या रिॲक्टर्समध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी मॉडरेटर म्हणून ‘ग्रेफाइट’ वापरण्यात आले होते.
ग्रेफाइट हा ज्वलनशील पदार्थ आहे. चेर्नोबिल येथे झालेल्या अपघातात त्याला भीषण आग लागली. त्या वेळी अमेरिकेने ‘आम्ही ग्रेफाइट वापरत नाही, म्हणून आमचे रिॲक्टर्स सुरक्षित आहेत’ अशी टिपणी केली होती. आपल्या देशाच्या ‘पीएचडब्ल्यूआर’ पद्धतीत मॉडरेटर म्हणून ग्रेफाइटऐवजी जड पाणी (हेवी वॉटर) वापरले जाते. ही अतिशय सुरक्षित पद्धत आहे.’
‘‘फुकुशिमा’ येथे अणुस्फोट घडला नाही’
रवींद्र काळे म्हणाले, ‘जपानच्या फुकुशिमा येथे झालेला अपघात ‘टेप्को’ या खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाला. फुकुशिमामध्ये समुद्राचे पाणी आत सोडून रिॲक्टर थंड करता आले असते, पण प्रकल्पाचे आर्थिक नुकसान होईल या भीतीने टेप्कोने ४८ ते ५० तास समुद्राचे पाणी सोडले नाही. त्यामुळे तिथे स्फोट झाला. मात्र, हा अणुस्फोट नव्हता; तो धातू आणि वाफेच्या प्रक्रियेतून तयार झालेल्या हायड्रोजन वायूचा स्फोट होता. आपल्या देशातील सर्व रिॲक्टर्स पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली आहेत. ते अत्यंत अनुभवी अभियंत्यांच्या देखरेखीखाली चालतात. त्यामुळे फुकुशिमा किंवा चेर्नोबिलसारखे अपघात आपल्या देशात होणे अशक्य आहे.’
