पुण्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे असोत.. पुणेकरांच्या डोक्यावर बळजबरीने येऊ घातलेल्या हेल्मेटला झालेला विरोध असो.. पर्यावरण रक्षण आणि वाहतूक नियमांच्या पालनाविषयीची जनजागृती असो.. प्रत्येक ठिकाणी अग्रभागी असणारे मंगेश तेंडुलकर म्हणजे सजग नागरिकांचे अराजकीय नेतृत्व.

समर्थ कुंचल्याचे व्यंगचित्रकार म्हणून केवळ आपल्याच हस्तिदंती मनोऱ्यात रममाण न होता लोकांमध्ये मिसळणारे, अशी तेंडुलकर यांची ख्याती होती. जन्मजात पुणेकर असल्यामुळे पुण्यातील पक्केपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये मुरलेला होता. माणसांमध्ये रमणारे आणि त्यांच्या सुख-दु:खाशी एकरूप होणारे तेंडुलकर आपल्यासमवेत आहेत याचा प्रत्येकाला भरभक्कम आधार वाटायचा. विषय आंदोलनाचा असो, पुणेकरांचा प्रश्न असो किंवा शहरातील नाटय़गृह आणि कलादालनातील असुविधांमुळे कलाकारांची होणारी गैरसोय अशा प्रत्येक गोष्टीवर तेंडुलकर सातत्याने आवाज उठावयाचे. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी दबदबा निर्माण केलेला असल्यामुळे त्यांच्या शब्दाला मान असायचा.

टिळक रस्त्यावरील भरधाव जाणाऱ्या ट्रकखाली चिरडून बालक दगावले आणि या घटनेमुळे व्यथित झालेल्या तेंडुलकर यांनी आवाज उठवून तीव्र आंदोलन केले. या लढय़ाला यश आले आणि त्याची परिणती टिळक रस्त्यावर जड वाहनांना बंदी होण्यामध्ये झाली. शहरातील सर्वच रस्त्यांवर पडलेले खड्डे हे चेष्टेचे कारण बनले. त्या खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण करण्याचे विधायक आंदोलन तेंडुलकर यांनी केले. त्याचा परिणाम पुणे महापालिकेवरील सत्तेमध्ये बदल होण्यामध्ये झाला. हेल्मेट सक्तीच्या विरोधात पुणेकरांनी जे जनआंदोलन उभारले होते, त्यामध्ये तेंडुलकर हे बिनीचे शिलेदार होते. त्या कालखंडात त्यांनी कुंचला आणि लेखणी अशा दोन्ही माध्यमांतून विरोध तर केलाच. पण, हेल्मेटचे भूत कायमचे दूर करण्यासाठी रस्त्यावर झालेल्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी झाले होते.

रस्ते अपघातामध्ये बळी पडणाऱ्या युवकांविषयी केवळ हळहळ व्यक्त करण्यापेक्षा काही तरी करण्याची त्यांची जिद्द एका नव्या उपक्रमशीलतेकडे घेऊन गेली. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉप चौकात तेंडुलकर हात जोडून विनंती करायचे. स्वत: केलेली व्यंगचित्रात्मक शुभेच्छापत्रे देऊन सिग्नलचे पालन करण्याचे आवाहन ते वाहनचालकांना करीत. शहरातील राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. समाजाविषयीची तळमळ असलेल्या तेंडुलकर यांच्या शब्दाला मान असायचा.

पुणेकरांशी समरस झालेले मंगेश तेंडुलकर प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झाले. त्यांच्यामुळे प्रश्नाचे गांभीर्य शासन आणि प्रशासन यंत्रणेच्या ध्यानात आणून देणे सोपे झाले. केवळ विरोधासाठी विरोध न करता पुणेकरांचे हित हाच तेंडुलकर यांच्या स्वभावातील गुण त्यांच्याकडे सजग नागरिकांचे नेतृत्व देऊन गेला.

सूर्यकांत पाठक (‘ग्राहक पेठ’चे कार्यकारी संचालक)