पुणे : महापालिकेच्या भवन विभागात भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविकेचा विनयभंग, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका काथित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बाणेर भागात आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी माजी नगरसेविकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्त्याने त्यांना धक्काबुक्की करुन विनयभंग केल्याचे माजी नगरसेविकेने फिर्यादीत म्हटले आहे.
परेश छबनराव गुरव (रा. साधना सोसायटी, हडपसर)असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. शहर काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या जवळची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत माजी नगरसेविकेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरवविरुद्ध विनयभंग, धक्काबुक्की, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमातून बाणेर भागात आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी माजी नगरसेविका विशेष प्रयत्नशील आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या या प्रकल्पासाठी पाठपुरावा करत आहेत. वसतिगृहाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. वसतिगृहाच्या शेवटच्या टप्प्यातील दोन कोटी रुपयांच्या कामाचे आदेश पालिकेने दिलेले नाहीत. हे कामाचे आदेश लवकर द्यावेत, यासाठी संबंधित माजी नगरसेविका महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे गेल्या होत्या. त्यावेळी गुरव तेथे आला. त्याने नगरसेविकेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अश्लील वर्तन करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे माजी नगरसेविकेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. गुरवने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्यामागे शहरातील काँग्रेसचा एक नेता आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.