scorecardresearch

किरीट सोमय्यांचा पुणे महापालिकेत जंगी सत्कार प्रकरणी, भाजपा शहराध्यक्षांसह ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी फिर्याद दिली आहे.

किरीट सोमय्यांचा पुणे महापालिकेत जंगी सत्कार प्रकरणी, भाजपा शहराध्यक्षांसह ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे महापालिकेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर मागील आठवड्यात शिवसैनिकांकडून हल्ला झाल्यानंतर, काल त्याच जागेवर भाजपाकडून सोमय्या यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पुणे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात या जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यासाठी महापालिकेच्या आवारात मोठ्यासंख्येने भाजपा नेते, कार्यकर्ते जमले होते. दरम्यान, यावेळी मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी देखील केली गेली.

पोलिसांनी या सत्काराच्या कार्यक्रमास विरोध दर्शवला होता मात्र तरी देखील भाजपा कार्यकर्ते महाापालिकेच्या आवारात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी करत सोमय्या यांचा सत्कार केला. यावेळी महापालिकेच्या आवारातील काही वस्तूंचे नुकसान झाल्याचेही समोर आले. शिवाय, एकाच जागेवर पाच पेक्षा जास्त लोक जमल्याने, आदेशाचेही उल्लंघन झाले. या प्रकरणी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह ३०० जणांविरोधात आज (रविवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यात ज्या पायरीवर धक्काबुक्की झाली, त्याच पायरीवर सोमय्यांचा भाजपाकडून सत्कार

पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शहाराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच त्यांच्यासोबत जवळपास ३०० च्या आसपास जमाव महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आला होता. त्यावेळी आम्ही त्यांना तुमचा जमाव बेकायदेशीर आहे, तुम्ही येथून निघून जा असं वारंवार सांगितलं होतं. मात्र कार्यकर्ते घोषणाबाजी करत राहीले आणि काहीवेळाने महापालिकेच्या आवारात शिरले.

या दरम्यान आवारातील काही साहित्याचे नुकसान देखील झाले आहे. त्याचबरोबर पाच पेक्षा अधिक नागरिकांनी एका जागेवर एकत्रित येऊ नये, या आदेशाचा देखील त्यांनी भंग केला आहे. त्यामुळे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.