पुणे : पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर आरोप करणे, बनावट स्वाक्षरींचे निवेदन तयार करून समाज माध्यमात पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या कथित माहिती अधिकार कार्यकर्ता सराईत गुंड ललित ससाणेविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ससाणेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती खडक पोलिसांनी दिली.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (वय ५३) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ललित ससाणेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २१२, २१७, २२४, तसेच पोलीस ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित ससाणे महात्मा फुले पेठेतील लोहियानगर परिसरात राहायला आहे. ससाणेने पोलीस दलाची प्रतिमा मलीन होईल, असे आरोप केले. त्याने खोटे गुन्हे दाखल केल्याचे नागरिकांना सांगितले होते. नागरिकांची बनावट स्वाक्षरी घेऊन त्याने निवेदन तयार केले. संबंधित निवेदन त्याने समाजमाध्यमात प्रसारित केले होते, असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस दलाची बदनामी, तसेच प्रतिमा मलीन करण्यासाठी तो जाणीवपूर्वक प्रयत्न करत होता. तीन दिवसांपूर्वी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून दोन व्यक्ती लोहियानगर येथून माझा पाठलाग करत आहेत. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण मला मारहाण करणार आहेत. मला मदत हवी आहे, अशी खोटी माहिती त्याने नियंत्रण कक्षाला दिली होती. या घटनेनंतर गस्त घालणारे दोन पोलीस कर्मचारी तेथे पाेहाेचले. तेव्हा ससाणे याने मी रुग्णालयात निघालो असून, पोलीस चौकीत नंतर तक्रार देतो, असे सांगितले. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज लोंढे यांनी ससाणेची चौकशी केली. माझ्या जिवाला धोका असून, पोलीस निरीक्षक चव्हाण माझ्या मागावर आहेत, असे त्याने सांगितले.
ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण साप्ताहिक सुटी असल्याने घरी होते. ससाणे याने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून खोटी माहिती दिली. चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ससाणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ससाणे हा लोहियानगर भागात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून वावरतो. त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह सहा गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती खडक पोलिसांनी दिली.