पिंपरी : वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या मोशीतील होर्डिंगच्या मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपल्याचे समोर आले असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद रमणलाल गांधी (वय ३८, रा. महर्षीनगर, पुणे) आणि हेमंत कुमार शिंदे (रा.कात्रज) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक ग्यानचंद भाट यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा…पुण्यातून उंटाची तस्करी… कसा उघडकीस आला प्रकार?

मोशी येथील गणेश साम्राज्य चौकात आनंद पब्लिसीटीचे ४० फुट बाय २० फुटाचे होर्डिंग उभारण्यात आले होते. गुरुवारी वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळले. त्यामध्ये दोन दुचाकी आणि एका टेम्पोचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. होर्डिंग अधिकृत असले, तरी जाहिरात फलकाची आणि होर्डिंगच्या मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली होती. त्याचे नुतनीकरण केले नाही. मानवीजीवित आणि व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे बेदरकारपणे, हयगय केल्याचे कृत्य केल्याचा ठपका ठेवता दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.