टाळेबंदीच्या काळात साखळी आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खटले विनाविलंब मागे घेतले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टा‌ळेबंदीला विरोध म्हणून हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी एप्रिल २०२१ मध्ये शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले होते. यादरम्यान सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवली नसताना जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांवर खटले दाखल करण्यात आले होते. करोना काळातील हे खटले मागे घेण्याची विनंती पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर हे खटले विनाविलंब मागे घेतले जातील, असे ठोस आश्वासन फडणवीस यांनी दिले, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी गुरुवारी दिली. 
व्यवसाय बंद असल्याने आणि त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलन केले होते. शांततमाय मार्गाने केलेल्या या आंदोलनात कोणतीही दगडफेक, जाळपोळ, सरकारी मालमत्तेचे नुकसान अशा घटना झाल्या नाही. त्यामुळे आता याप्रकरणी दाखल झालेले खटले मागे घेतले जावेत, अशी विनंती फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून विषय पूर्णत्वास न्यावा असे निर्देश फडणवीस यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिले.

‘हर घर तिरंगा’मध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग
स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवनिमित्ताने केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानामध्ये व्यापारी सहभागी होणार आहेत. आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केले आहे. 
व्यापाऱ्यांनी १३ ते १५ ऑगस्टपर्यंत आपआपल्या घरी तिरंगा फडकवावा. दुकानांवर रोषणाई आणि सजावट करावी. तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून देशाच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन रांका यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases against traders are withdrawn without delay pune print news amy
First published on: 11-08-2022 at 17:15 IST