पुणे : भांडी विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ४१ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना शुक्रवार पेठेतील पं. नेहरु चौकात घडली.

या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका भांडी विक्री करणाऱ्या व्यावासयिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक कसबा पेठेतील तांबट आळी परिसरात राहायला आहेत. त्यांचे शुक्रवार पेठेतील पं. नेहरु चौकात तांबे-पितळ्याची भांडी विक्रीचा व्यवसाय आहे. चोरट्यांनी ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले.

गल्ल्यातील ४१ हजार ३०० रुपये चोरुन चोरटे पसार झाले. रविवारी (१ फेब्रुवारी) सकाळी दुकानाचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. पं. नेहरु चौक गजबजलेला परिसर आहे. या भागात भांडी विक्रीची दुकाने आहेत. दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यावसायिकांमध्ये घबराट उडाली.

पं. नेहरु चौकापासून काही अंतरावर बोहरी आळी, कापडगंज या व्यापारी पेठा आहेत. पोलिसांनी पं. नेहरु चौकातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुकानांचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. बाणेर, कोंढवा, माॅडेल काॅलनीतील दीपबंगला चौक, येरवडा भागात दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या.

विश्रांतवाडीत भरदिवसा घरफोडी

भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १० लाख ८० हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धानोरीतील लोटस ग्रेस सोसायटीत राहायला आहे.

३१ जानेवारी रोजी सकाळी तक्रारदार महिला आणि कुटुंबीय कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी १० लाख ८० हजारांचे दागिने लांबविले. काम आटोपून महिला घरी आल्यानंतर सदनिकेचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले. पाेलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.