पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांना लुबाडल्याची नोंद करण्यात आली आहे
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात भाविक महिलेच्या पिशवीतून सात हजारांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना घडली.याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या मुंबईतील मालाड येथील रहिवासी आहेत. त्या पुण्यात आल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातून त्या दर्शन घेऊन बाहेर आल्या. शिवाजी रस्त्यावर गर्दी होती. चोरट्याने त्यांच्या पिशवीतून सात हजारांची रोकड आणि कागदपत्रे लांबविली. हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार साबळे तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली.याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला भोसरीत राहायला आहे. ती हडपसरमध्ये नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पीएमपी बसने जात होती. प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेच्या पिशवीतून दोन लाख ६५ हजारांचे दागिने लांबविले. मगरपट्टा थांब्यावर महिला बसमधून उतरली. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार तपास करत आहेत.