सीबीआय कारवाईत नोटा बदलून देणारी मोठी साखळी उघडकीस वर्ल्ड वाईल्ड ऑईल फिल्ड मशिन्स, ईशान्य मोटार्स यांच्याकडे सापडलेल्या नव्या नोटांबाबत तपास करताना जुन्या नोटा बदलून देणाऱ्या व्यापाऱ्यांची मोठी साखळीच उघड झाली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने मार्केट यार्डमधील ३० दुकानांवर गुरुवारी सकाळी छापा टाकला असून कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. नोटा बदलून देण्यासाठी घेण्यात आलेल्या दलालीसंदर्भातील कागदपत्रांचा यात समावेश आहे. वर्ल्ड ऑईल फिल्ड मशिन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईत बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेच्या लॉकरमध्ये तब्बल बारा कोटी रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करत असताना नोटा बदलून देणारे मोठे रॅकेटच समोर आले आहे. या रॅकेटमध्ये गुलटेकडी, मार्केट यार्डसह धनकवडीमधील काही मोठे व्यापारी सहभागी असल्याचे उघड झाले आहे. या साखळीत काम करणारे तब्बल ४० मोठे मासे प्राप्तिकर विभागाच्या तपासात समोर आले आहेत. प्राप्तिकर विभागाकडून तसेच सीबीआयच्या तपासामधून मिळालेल्या माहितीनुसार ३० व्यापाऱ्यांवर गुरुवारी सकाळी छापे टाकण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. वर्ल्ड वाईड ऑईल फिल्ड कंपनीच्या कार्यालयात तसेच महाराष्ट्र बँकेच्या पर्वती शाखेतील लॉकर्समध्ये तब्बल ११ कोटी ७० लाखांची रोकड सापडली होती. कंपनीने हा काळा पैसा ईशान्य मोटर्सच्या सत्येन गथानी आणि अन्य काही व्यापाऱ्यांच्या मदतीने पांढरा करून घेतल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची पुढील चौकशी करत असताना ही साखळी उघड झाली आहे. या साखळीत सहभागी असलेल्या व्यापाऱ्यांवर गुरुवारी सकाळी छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. या कारवाईदरम्यान व्यापाऱ्यांनी नोटा बदलून देण्यासाठी घेतलेल्या दलालीचे तपशील उघड करणारी काही कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत. मार्केट यार्डमधील भुसार आणि किराणा बाजारातील व्यापाऱ्यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.