पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात शहरातील शाळांनी दमदार कामगिरी केली. बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत यश संपादन केले.
ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील सर्व ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा सरासरी निकाल ९०.५ टक्के लागला. अथर्व भिडे याने ९८ टक्क्यांसह प्रथम क्रमांक मिळवला. प्रशालेतील २५ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. २९ विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले. अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. रिधिमा भगवती हिने ९८ टक्के गुणांसह अव्वल येत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि हिंदी या विषयांत पूर्ण गुण मिळवले. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ५६.४ टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. मूर्तजा रावत याने ९९.८ टक्के, निहार लोहाडे याने ९९.४, ऋषभ कोरलाहल्ली ९९.२ टक्के मिळवले.
ऑर्बिस स्कूल्सच्या मुंढवा आणि केशवनगर या दोन्ही संकुलांचा निकाल १०० टक्के लागला. केशवनगर शाळेतील शिवांश सिंग ९८.६० टक्के, तर मुंढव्याच्या शाळेतील जैविक मोटा याने ९८.२ टक्क्यांसह पहिला क्रमांक मिळवला. ‘यंदाचा निकाल विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम आणि चिकाटीचे प्रतीक आहे. संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन यश मिळवले. शिक्षक आणि पालकांच्या सहकार्यामुळे यश मिळाले आहे,’ असे मुंढवा येथील द ऑर्बिस स्कूलच्या प्राचार्य स्मिता पेंढारकर यांनी सांगितले.
बावधन येथील रायन इंटरनॅशनल ॲकॅडमीचा निकाल १०० टक्के लागला. रितिका रेओसेकरने ९६.८ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला. वडगाव बुद्रुक येथील हेलिओस इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीच्या पहिल्याच तुकडीचा निकाल १०० टक्के लागला. अंजली सरगंडलाने ९६.८ टक्क्यांसह प्रथम, युग बोराने ९५.८ टक्क्यांसह द्वितीय क्रमांक मिळवला. संस्कृती स्कूल्सच्या सर्व संकुलांतील शाळांचा निकाल १०० टक्के लागला. आभा भोक्से हिला ९८.६ टक्के, रुद्र चौधरी याला ९८.४ टक्के गुण मिळाले. ‘शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली,’ असे संस्कृती स्कूल्सच्या संस्थापक देवयानी मुंगळी यांनी सांगितले. द कल्याणी स्कूलमध्येही १०० टक्के निकाल लागला. आर्यन गोदानी आणि रोमिल कुलकर्णी यांनी ९८.६ टक्क्यांसह संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला.
पुणे विभागाचा निकाल
‘सीबीएसई’ने जाहीर केलेल्या निकालात महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९६.६६ टक्के लागला. देशात पुणे विभाग सातव्या स्थानी आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.७९ टक्के लागला. पुणे विभागातील १ हजार ४९६ शाळांतील एकण १ लाख ३३ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ७५ हजार ९४० मुले, ५७ हजार ७२३ मुलींचा समावेश होता. त्यातील ७५ हजार ७७१ मुले, ५७ हजार ६६१ मुली अशा एकूण १ लाख ३३ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांपैकी ७२ हजार ८४८ मुले, ५६ हजार ८५ मुली असे एकूण १ लाख २८ हजार ९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
