पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या पुनर्पडताळणी, पुनर्मूल्यांकन सेवेंतर्गत १.६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ३.८ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांच्या पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीविना पार पडल्याचा दावा ‘सीबीएसई’कडून करण्यात आला आहे. मात्र, अनेक विद्यार्थी, पालकांनी या प्रक्रियेत अडचणी आल्याचा दावा समाजमाध्यमांत केला आहे. ‘सीबीएसई’ने याबाबतची माहिती दिली.

‘सीबीएसई’ने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी यंदा ऑनस्क्रीन मूल्यांकन प्रक्रिया वापरण्यात आली. मात्र, या प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांनीच प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे ‘सीबीएसई’ने उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन, गुणपडताळणीची सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी २ ते ७ जूनची मुदत देण्यात आली. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरक्षित पार पाडण्यासाठी आयआयटीचे तज्ज्ञ, सरकारी तांत्रिक संस्थांच्या पथकांनी विशेष देखरेख ठेवली. तसेच, सायबर धोके रोखण्यासाठी विशेष सायबर सुरक्षा पथके तैनात होती, अशी माहिती ‘सीबीएसई’ने दिली. काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त आणि समाजमाध्यमांतील पोस्टमध्ये विद्यार्थ्यांचा ‘रोल नंबर’ ‘सीबीएसई’च्या प्रणालीमध्ये सापडत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्याबाबत ‘सीबीएसई’कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

‘‘रोल नंबर नॉट फाउंड’ हा संदेश तांत्रिक त्रुटीमुळे नाही, तर प्रक्रियेच्या नियमांमुळे दिसत आहे. निकालोत्तर प्रक्रियेच्या नियमानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज केला होता, तेच विद्यार्थी पुनर्पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी पात्र आहेत. त्यामुळे छायाप्रतीसाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनाच ‘रोल नंबर नॉट फाउंड’ हा संदेश दिसत आहे,’ असे ‘सीबीएसई’ने नमूद केले आहे.

‘अर्ज प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सीबीएसईचे विशेष मदतकक्ष, तक्रार निवारण कक्ष २४ तास कार्यरत होते. यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्व शंका, समस्यांचे वेळेत निवारण केले जाईल,’ अशी ग्वाही ‘सीबीएसई’ने दिली आहे.

‘सीबीएसई’ने समाजमाध्यमात केलेल्या पोस्टखाली काही विद्यार्थी, पालकांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या आहेत. त्यात ‘सीबीएसई’ने निकालोत्तर सेवांबाबत केलेले दावे खोडण्यात आले आहेत. २ ते ७ जून या कालावधीत अर्ज करताना आलेल्या समस्या ‘स्क्रीनशॉट’सह मांडण्यात आल्या आहेत.