पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) कनिष्ठ लेखापाल, तसेच सहायक पदासाठी आयोजित केलेल्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित कमलसिंग शर्मा (वय २५, रा. सिधमुख, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत परीक्ष केंद्रातील पर्यवेक्षकांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओैंधमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रविवारी ‘सीबीएसई’ कडून परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यवेक्षकांनी अमित शर्मा याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. ओळखपत्रातील नावावरुन संशय आला. चौकशी केल्यानंतर अमित हा तोतया परीक्षार्थी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.
मोटारचालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग
प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना बाणेर भागात घडली. या प्रकरणी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मोटार चालकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४२ वर्षीय महिला बाणेर परिसरात राहायला आहे. त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲप आधारित मोटार सेवेसाठी नोंदणी केली.
मोटार चालकाने महिलेला रविवारी (१ फेब्रुवारी) सकाळी पावणेनऊच्या सुमारास बाणेर परिसरात सोडले. मोटार भाड्यावरुन मोटार चालक आणि महिलेत वाद झाला. त्यानंतर महिलेशी अश्लील कृत्य करुन मोटार चालक पसार झाला. पसार झालेल्या मोटार चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार शिरसाठ तपास करत आहेत.
मोटारीतून सोडण्याची बतावणी करुन तरुणाला लुटले
मोटारीतून पुणे स्टेशनला सोडण्याची बतावणी करुन मोटार चालक आणि साथीदारांनी तरुणाला लुटल्याची घटना नगर रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी मोटार चालकासह त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटार चालकासह त्याच्याबरोबर असलेल्या चार साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण सोमवार पेठेतील नरपरतगिरी चौकात राहायला आहे. ३० जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास नगर रस्ता परिसरात स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत थांबला होता. त्या वेळी मोटार चालक आणि साथीदार मोटारीतून तेथे आले. आरोपींनी तरुणाला पुणे स्टेशनपयर्यंत सोडतो, अशी बतावणी केली. त्यानंतर तरुणाला मोटार चालक आणि साथीदारांनी मारहाण केली. त्याला नगर रस्ता, बंडगार्डन रस्ता परिसरातून नेण्यात आले.
तरुणाला जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने १८ हजार रुपये घेतले. तरुणाला रस्त्यात सोडून आरोपी मोटार चालक साथीदारांसह पसार झाला. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार तपास करत आहेत.

