पुणे : इंग्रजीचा समावेश परदेशी भाषा विभागात केल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न इंग्रजी शाळांत शिकणाऱ्यांना अन्य परकीय भाषा शिकण्याचा पर्याय बंदच होण्याची शक्यता आहे. मुळात इंग्रजी ही देशात भाषिक व्यवहारांसाठी अधिकृत भाषा असताना, तिला परदेशी भाषा विभागात टाकण्याचे प्रयोजन काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आधारित शिक्षण आराखड्यानुसार, ‘सीबीएसई’ने इयत्ता सहावीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय असणार आहेत.

‘महाराष्ट्रात हे सूत्र लागू करताना मुळात विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असेल, तर इंग्रजी ही माध्यम भाषा असेलच. राज्यात मराठी सक्तीची असल्याने मराठी ही दुसरी भाषा असेल. आता उरलेली तिसरी भाषा भारतीयच असावी लागणार असल्याने हिंदी, संस्कृतसह अन्य भारतीय भाषांचा त्यासाठी पर्याय असेल. अशा वेळी फ्रेंच, जर्मन, जपानी आदी परकीय भाषा शिकण्याचा पर्याय विद्यार्थ्याला उपलब्ध असणार नाही, कारण या गटातील इंग्रजी ही भाषा तो शिकतच असेल,’ असे निरीक्षण शिक्षणतज्ज्ञांनी नोंदवले.

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य डॉ. मिलिंद नाईक म्हणाले, ‘सीबीएसईशी संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. त्यामुळे इंग्रजी ही माध्यम भाषा असेलच. महाराष्ट्रात मराठी सक्तीची असल्याने मराठी दुसरी भाषा, तर भारतीय भाषांच्या गटातून प्रामुख्याने हिंदी, संस्कृतचे पर्याय विद्यार्थी निवडू शकतात. तिसऱ्या भाषेचे अन्य पर्याय विद्यार्थिसंख्येवर अवलंबून असतील. पण, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी अशा परदेशी भाषा विद्यार्थ्यांना मुख्य विषय म्हणून नाही, तर अतिरिक्त विषय म्हणूनच शिकावे लागतील.’

‘सध्या विद्यार्थी प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषा शिकतात. जर्मन स्वतंत्रपणे शिकवली जाते. आता ‘सीबीएसई’ने जाहीर केलेल्या नव्या रचनेतही इंग्रजी, हिंदी, मराठी कायम राहतील, असे दिसते. परदेशी भाषा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे शिकावी लागणार आहे,’ असे निरीक्षण सीबीएसई शाळेच्या एका शिक्षकानेही नोंदवले.

मिलेनियम नॅशनल स्कूलच्या अभ्यासक्रम विभागप्रमुख राधिका वैद्य म्हणाल्या, ‘भविष्यात इंग्रजी हे माध्यम (मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन) ठेवून अन्य परदेशी भाषा निवडण्याचा पर्याय निवडता आल्यास विद्यार्थ्यांना परदेशी भाषा मुख्य विषय म्हणून शिकता येईल.’