पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) २०२६-२७या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य केले आहे. त्यापैकी दोन भाषा या स्थानिक भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. तसेच, तिसऱ्या भाषेचे मूल्यमापन शाळास्तरावरच केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘सीबीएसई’ च्या शैक्षणिक प्रमुख डॉ. प्रज्ञा सिंग यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. ‘सीबीएसई’ने महिनाभरापूर्वी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात इयत्ता सहावीपासून तिसरी भाषा अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता नव्या परिपत्रकानुसार १ जुलै २०२६ पासूनच इयत्ता नववीला तिसरी भाषा लागू असल्याचे जाहीर केले आहे. परदेशी भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर दोन भारतीय भाषा शिकणे आवश्यक आहे. अन्यथा, चौथी भाषा म्हणूनही परदेशी भाषा शिकता येणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने तिसऱ्या भाषेचे मूल्यमापन पूर्णपणे शाळास्तरावर अंतर्गत पद्धतीने होईल. विद्यार्थ्याची तिसऱ्या भाषेतील कामगिरी प्रमाणपत्रात नमूद करण्यात येईल. तसेच, तिसऱ्या भाषेमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला दहावीला बोर्डाची परीक्षा देण्यापासून रोखले जाणार नाही. नमुना प्रश्नपत्रिका आणि अंतर्गत मूल्यमापनासाठीचे निकष लवकरच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘सीबीएसई’ च्या विषय यादीतील कोणतीही भाषा निवडण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. मात्र, तीन भाषांपैकी दोन भाषा स्थानिक भारतीय भाषा असणे आवश्यक आहे.

‘तुलनात्मक विश्लेषणानुसार माध्यमिक स्तरातील तिसरी भाषा आणि मध्यम स्तरातील भाषा कौशल्यांमध्ये (मौखिक संवाद, वाचन. उपलब्ध होईपर्यंत इयत्ता नववीतील साम्य आहे. त्यामुळे तिसऱ्या भाषेसाठीची स्वतंत्र पाठ्यपुस्तके जागरूकता) सुमारे ७५ ते ८० टक्के (पान १ वरून) आकलन, लेखी अभिव्यक्ती आणि व्याकरण विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेची इयत्ता सहावीची पाठ्यपुस्तके (२०२६-२७ आवृत्ती) वापरावीत. माध्यमिक स्तरासाठी अपेक्षित कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळांनी लघुकथा, कविता, माहितीपर लेखन अशा साहित्याचा पूरक साहित्य म्हणून वापर करावा,’ असे पत्रकात नमूद केले आहे.

‘पूरक साहित्याची निवड, अध्यापनासंबंधीत सविस्तर मार्गदर्शक सूचना १५ जूनपर्यंत उपलब्ध होतील. १९ अनुसूचित भारतीय भाषांमधील इयत्ता सहावीची तिसऱ्या भाषेची पाठ्यपुस्तके १ जुलैपूर्वी शाळांना उपलब्ध होतील. उर्वरित भारतीय भाषांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) राज्यस्तरीय साधनांचा वापर पूर्वीप्रमाणे करता येईल,’ असे स्पष्ट केले आहे.

शिक्षक उपलब्धता कशी होणार?

तिसऱ्या भाषेसाठीच्या शिक्षकांच्या उपलब्धतेबाबत सीबीएसईने शाळांना सवलत दिली आहे. त्यानुसार भारतीय भाषांचे कार्यक्षम ज्ञान असलेल्या इतर विषयांच्या विद्यमान शिक्षकांची नियुक्ती करता येईल. सहोदय गटांमार्फत शाळांमधील संसाधनांची देवाणघेवाण, ऑनलाइन किंवा मिश्र अध्यापन सहाय्य, निवृत्त भाषा शिक्षकांची नियुक्ती, तसेच आवश्यक पात्रता असलेल्या पदव्युत्तर उमेदवारांचा वापर करता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.