पुणे : गॅस टंचाईचे कारण देऊन उपाहारगृहचालकांनी ग्राहकांकडून जादा पैसे आकारू नयेत, अशा सूचना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाहारगृहचालकांनी ग्राहकांकडून जादा पैसे आकारण्यास सुुरुवात केली. काही उपाहारगृहचालकांनी याबाबतचा उल्लेख बिलात करण्यास सुरुवात केली. छापील बिलात गॅसटंचाईचे अतिरिक्त पैसे आकारण्यात आल्याचे नमूद करण्यात आल्याच्या तक्रारी आल्या.
याबाबत समाज माध्यमातील तक्रारी, तसेच ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींची दखल नवी दिल्लीतील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून घेण्यात आली असून, गॅस टंचाईच्या काळात ग्राहकांकडून जादा पैसे आकारू नयेत, अशा सूचना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (सीसीपीए) मुख्य आयुक्त निधी खरे यांनी दिल्या आहेत.
आहारतालिकेत उल्लेख नको
‘सीसीपीए’कडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ‘कोणत्याही उपाहारगृहचालकांनी (हाॅटेल, रेस्टाॅरंट, बार) गॅस टंचाईचे कारण सांगून ग्राहकांकडून जादा पैसे घेऊ नयेत. उपाहारगृहाच्या आहारतालिकेत (मेन्यू कार्ड) असा उल्लेख करणे, ही अनुचित व्यापार पद्धती मानली जाईल,’ अशा सूचना ‘सीसीपीए’ने उपाहारगृह चालकांना दिल्या आहेत.
गॅस टंचाईचे कारण किंवा सबब सांगून ग्राहकांकडून जादा पैसे आकारणे ही अनुचित व्यापार पद्धती आहे. गॅस टंचाईचे कारण सांगून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा घेणे हे ग्राहक हिताच्या विरोधी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने देशभरातील उपाहारगृहचालकांना दिलेल्या सूचना, तसेच निर्णय हा स्वागतार्ह आहे. – ॲड. ज्ञानराज संत, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा कन्झ्युमर ॲडव्होकेट्स असोसिएशन
