scorecardresearch

आता वाहतूक पोलिसांवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना चाप बसला आहे.

आता वाहतूक पोलिसांवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
(संग्रहित छायाचित्र)

गजबजलेले चौक सोडून अन्यत्र जाणाऱ्या पोलिसांवर कारवाई

गजबजलेल्या चौकात तसेच रस्त्यावर वाहतूक नियमन न करता बाजूला जाऊन थांबणे किंवा वाहतूक नियमन करताना मोबाइलवर संभाषण करणे, रात्रीच्या वेळी फ्लोरोसंट जर्किन न घालणे, एलईडी बॅटनचा वापर न करणे, टोपी न घालणे अशा प्रकारच्या चुका करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांबरोबरच वाहतूक नियमन करताना चुका करणाऱ्या वाहतूक पोलिसांवरदेखील वरिष्ठ अधिकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळेत चौक सोडून जाणाऱ्या पोलिसांना अटकाव घालणे शक्य झाले असून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे चौक तसेच रस्त्यांवर दररोज सकाळी आणि सायंकाळी दोन ते तीन तास मोठय़ा प्रमाणावर वाहतूक असते. राज्य शासनाकडून गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात शहरातील महत्त्वाचे चौक आणि प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयातून सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण कक्षातून (कमांड सेंटर) संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे एखाद्या भागात वाहतुकीची कोंडी झाल्यास तातडीने तेथील कोंडी दूर करणे किंवा तेथे अपघात झाल्यास तेथे पोलिसांना दाखल होण्याच्या सूचना देण्यात येतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून  नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून ई-चलन यंत्रणेचा वापर करून दंड वसूल करण्यात येतो, तसेच त्यांच्या मोबाइलवर तातडीने संदेश पाठविण्यात येतो.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना चाप बसला आहे. काही महत्त्वाच्या चौकात गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलीस कोपऱ्यात थांबल्याचे निदर्शनास आले आहे. चौक सोडून कोपऱ्यात थांबणाऱ्या किंवा मोबाइलवर संभाषण करणाऱ्या पोलिसांवर आमचे लक्ष असून त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

गर्दीच्या वेळी वाहतूक नियमन करण्याऐवजी कोपऱ्यात थांबणे, मोबाइलवर संभाषण करणे, टोपी न घालणे अशा त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. रात्रीच्या वेळी चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना फ्लोरोसंट जर्किन तसेच एलईडी बॅटन (छोटे दांडके) देण्यात आले आहेत. अनेक पोलिसांनी रात्रीच्या वेळी फ्लोरोसंट जर्किंन आणि एलईडी बॅटनचा वापर केला नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाहनचालकांबरोबरच वाहतूक पोलिसांना शिस्त लावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. जे वाहतूक पोलिस नियमन करताना चुका करतात, अशांना लेखी समज देऊन कारवाई करण्यात येत आहे. या

* वाहतूक पोलिसांकडून केले जाणारे नियमभंग

*  गर्दीच्या चौकात वाहतूक नियमनाऐवजी कोपऱ्यात थांबणे

*  मोबाइलवर संभाषण करणे

* रात्रीच्या वेळी फ्लोरोसंट जर्किनचा वापर न करणे

एलईडी बॅटनचा वापर न करणे

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-07-2017 at 04:30 IST

संबंधित बातम्या