VIDEO: लोणावळ्यात वृद्ध दांपत्याचे हात पाय बांधून दरोडा; पहा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

सहा दरेडेखोरांनी थेट बेडरुममध्ये घुसून लुटला ६६ लाखांचा ऐवज

Lonavla Crime, Lonavla Theft, Lonavla Dacoity, Lonavla CCTV
सहा दरेडेखोरांनी थेट बेडरुममध्ये घुसून लुटला ६६ लाखांचा ऐवज

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात वृद्ध दांपत्याला घरात घुसूल लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा जणांच्या टोळक्याने दांपत्याला शस्त्राचा धाक हात पाय बांधले आणि घरातून तब्बल ६६ लाखांचा ऐवज लुटून नेला आहे. यामध्ये ५० लाखांची रोख रक्कम आणि १६ लाखांचे सोन्याचे दागिने असा ऐवज होता. दरम्यान ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पोलिसांना माहिती दिल्यास एक महिन्यांतर पुन्हा येऊ आणि जीवे मारू; लोणावळ्यात वृद्ध दांपत्याचे हात पाय बांधून दरोडा

सीसीटीव्हीत हे दरोडेखोर कैद झाले असून परिसरात रेकी करत असल्याचं दिसत आहे. तसंच चोरी केल्यानंतर घराच्या खिडकीतून खाली उतरत असल्याचंही दिसत आहे. खाली उतरण्यासाठी त्यांनी एक कपडा बांधलेलाही दिसत आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.

नेमकं काय झालं –

डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल यांच्या घरात हा दरोडा टाकण्यात आला असून ते बालरोग तज्ञ आहेत. मध्यरात्री टाकलेल्या या दरोड्याप्रकरणी लोणावळा पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७३ वर्षीय डॉ. हिरालाल हे बालरोग तज्ञ असून लोणावळ्यात त्यांचे हॉस्पिटल आहे. ते आणि त्यांची पत्नी हॉस्पिटलमधील पहिल्या मजल्यावर राहतात. रुग्णालयात रात्रपाळीला तीन कर्मचारी असतात. दरम्यान, मध्यरात्री अचानक सहाजणांचे टोळके थेट डॉक्टरांच्या बेडरूमध्ये आले. चाकूचा धाक दाखवून ओरडलात तर जीवे मारू अशी धमकी दिली. हरीलाल आणि त्यांची पत्नी विजया दोघे घाबरले होते. दरोडेखोरांनी दोघांचे हात आणि पाय दोरीने बांधून कपाटाच्या चाव्या आणि पैशांची मागणी केली. भेदरलेल्या विजया यांनी ड्रायव्हरमध्ये चाव्या असल्याचं सांगितलं. यानंतर दरोडेखोरांनी कपाटातून तब्बल ६६ लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी बाहेर काढला ज्यामध्ये ५० लाखांची रोख रक्कम आणि १६ लाखांच्या दागिन्यांचा समावेश होता.

या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यास एक महिन्यांतर पुन्हा येऊ आणि जीवे मारू अशी धमकी दरोडेखोरांनी दिली आणि पसार झाले. दरम्यान, दरोडेखोर गेल्याची खात्री होताच दोरीने बांधलेले हात, पाय डॉक्टरांनी सोडून अलार्म वाजवला. त्यानंतर रात्रपाळीला असलेले कामगार धावतपळत वर आले. त्यांच्यातील एकाने लोणावळा पोलिसांना तातडीने बोलावले. सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीत कावत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली आहे. अज्ञात दरोडेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cctv footage of lonavla dacoity two elders looted for 66 lakhs kjp 91 sgy