पुणे : गंधर्व नाटक मंडळीच्या सुवर्णस्मृतींना ‘सावतामाळी भवन’मध्ये उजाळा

संगीत रंगभूमीच्या सुवर्णस्मृतींना ‘सावतामाळी भवन’मध्ये मंगळवारी नव्याने उजाळा देण्यात आला.

( प्रतिनिधिक छायाचित्र )

संगीत रंगभूमीच्या सुवर्णस्मृतींना ‘सावतामाळी भवन’मध्ये मंगळवारी नव्याने उजाळा देण्यात आला. संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ अजरामर करणारे नटसम्राट बालगंधर्व, संगीतकार गोविंदराव टेंबे आणि नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांच्या उपस्थितीत स्थापन झालेल्या ‘गंधर्व नाटक मंडळी’चा शतकोत्तर दशकपूर्ती समारंभ त्यांच्या वंशजांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करून साजरा झाला.

गंधर्व नाटक मंडळी’च्या ११० व्या स्थापनादिनानिमित्त बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, गोविंदराव टेंबे यांचे नातू दीपक टेंबे आणि गणपतराव बोडस यांचे पणतू व प्रसिद्ध ऑर्गनवादक राहुल गोळे यांचा मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नाट्यसंगीत गायक रवींद्र कुलकर्णी, मंडळाचे कोषाध्यक्ष नारायण भालेराव, सचिव अवंती बायस, विवेक काटकर आणि संतोष रासकर या वेळी उपस्थित होते. बालगंधर्व यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांच्या गाजलेल्या नाटकांमधील संवादांचे सादरीकरण झाले.

साखवळकर म्हणाले, मतभेदांमुळे किर्लोस्कर नाटक मंडळीमधून बाहेर पडून बालगंधर्व, गोविंदराव टेंबे आणि गणपतराव बोडस यांनी ५ जुलै १९१३ रोजी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर बुधवार पेठेतील माळ्यांची धर्मशाळा म्हणजेच सध्याचे सावतामाळी भवन येथे ’गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली. या नाटक कंपनीला काकासाहेब खाडिलकर यांनी ’गंधर्व नाटक मंडळी’ हे नाव दिले. साहित्यसम्राट न. चिं. केळकर, सॉलिसिटर पी. एम. लाड, पेण येथील बाबासाहेब धारकर, मुंबई येथील डी. एल. वैद्य असे दिग्गज या वेळी उपस्थित होते. संगीत रंगभूमीवरील या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यात आला ही आनंदाची बाब आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Celebrate the golden memories of gandharva drama circle in savtamali bhavan pune print news amy

Next Story
पुणे : मुसळधार कायम, अतिवृष्टीचा इशारा ; मुंबईसह संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पाच दिवस पाऊस
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी