scorecardresearch

सातारा : १०० वर्षांच्या वृक्षाचा नव्या मातीत मोकळा श्वास! पुनरुज्जीवित वटवृक्षाचा आज वाढदिवस

हडपसरमधील १०० वर्षाचा वटवृक्षाचे साताऱ्यातील जैवविविधता उद्यानात पुनरुज्जीवित करण्यात आले आहे.

Celebrating the birthday of a 100-year-old tree
सातारा येथील जैवविविधता उद्यानात १०० वर्ष जुन्या झाडाचा वाढदिवस साजरा

कोणत्याही विकास कामासाठी तोडलेले झाड किंवा मोठे वृक्ष यांचे पुनर्रोपण केले जावे, याबाबत वन विभाग आणि पर्यावरणप्रेमी आग्रही असतात, मात्र नेहमी तसे होतेच असे नाही. मात्र, हडपसरमध्ये तोडण्यात आलेल्या एका महाकाय वटवृक्षाचे सातारा येथे २६ जानेवारी २०२२ रोजी पुनर्रोपण करण्यात आले आणि त्या वटवृक्षानेही साताऱ्याच्या मातीत स्वत:चे हातपाय रोवले. त्याच्या पुनरुज्जीवनानंतरचा पहिला वाढदिवस आज (२६ जानेवारी) सह्याद्री देवराई आणि सातारा पोलिसांनी निर्मिती केलेल्या साताऱ्यातील जैवविविधता उद्यानात साजरा करण्यात येत आहे.

हेही वाचा- पुणे : तीन वर्षांत कसब्यातील मतदारांत १५ हजाराने घट; चिंचवडमध्ये ४८ हजार मतदार वाढले

गेली १०० वर्षे या वटवृक्षाचीमुळे हडपसरच्या मातीत रुजली होती. मात्र, जमीन मालकाला तो वृक्ष नकोसा झाल्यामुळे त्याच्यावर कुऱ्हाड चालवण्यात आली. या वटवृक्षाचे जतन करण्याच्या उद्देशाने सातारा येथे त्याचे पुनर्रोपण करण्यात आले. गेले एक वर्ष या वटवृक्षाने आपली पाळेमुळे नवीन जमिनीवर घट्ट केल्याने आता वृक्ष आणि मानव यांच्यातील नाते चिरंतन राखण्यासाठी त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचा- अपायकारक मेदामुळे दरवर्षी जगातील पाच अब्ज नागरिकांना हृदयविकार; जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल प्रकाशित

सह्याद्री देवराई संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले, की अडचण झाली म्हणून वटवृक्षावर कुऱ्हाड चालवलेल्या एका व्यक्तीकडून आम्ही हा वटवृक्ष सातारा येथे नेला. शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळाले आणि पालवीही फुटली आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिक, वारकरी, विद्यार्थी मिळून त्याचा वाढदिवस साजरा करणार आहोत. रस्ते आणि विकास कामांच्या दरम्यान कापली जाणारी झाडे अशा पद्धतीने पुनर्रोपण केली असता जिवंत राहू शकतात, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि अनेक वृक्षांना नवजीवन देण्यात हातभार लावावा, असे आवाहन शिंदे यांनी यानिमित्ताने केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 11:25 IST