पुणे : आपल्या अनोख्या शब्दकळेने अगणित सूर्य पेटविणारे विद्रोही, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याबरोबरच समाजातील दंभावर आपल्या लेखणीने आसूड ओढून वास्तवाची जाण करून देणारे ‘गोलपीठा’कार ‘नामदेव ढसाळ कोण?’ असा जो प्रश्न सेन्साॅर बोर्डाने उपस्थित केला होता, त्याला विधायक उत्तर काही कार्यकर्त्यांनी देण्याचे ठरविले.
‘तुही यत्ता कंची?’ असा प्रश्न विचारून प्रस्थापितांना जागे करणाऱ्या ढसाळ यांची कविता हेच या कार्यक्रमाचे शीर्षक ठरले आणि ढसाळ कोण, असा प्रश्न विचारणाऱ्या सेन्साॅर बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना हे सकारात्मक उत्तर दिले गेले. ‘कोण नामदेव ढसाळ? तुही यत्ता कंची?’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाद्वारे सगळ्यांच्या यत्ता तपासणाऱ्या या महाकवीची ३० नोव्हेंबर रोजी पुणेकरांना पुनर्भेट घडणार आहे.
बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ याच्या कवितांचा वापर असलेल्या महेश बनसोडे दिग्दर्शित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘कोण नामदेव ढसाळ,’ असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाने उपस्थित केल्याने हा मुद्दा तापला होता. चित्रपटाची कथा दलित पँथर, युवक क्रांती दल या चळवळींवर आधारित असून, यामध्ये वापरण्यात आलेल्या कविता आक्षेपार्ह असल्याचा आक्षेप सेन्सॉर बोर्डाने घेतला होता.
‘कवितेत शिव्या आणि अश्लीलता असून, त्या चित्रपटातून काढाव्यात,’ असे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याने मांडले होते. त्यावर ढसाळ यांच्याबाबत माहिती दिली असता, ‘कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही,’ असे उत्तरही अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. या प्रश्नावर महाराष्ट्रात वादळ उठले. तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर काही लेखक, कलावंत, पत्रकार, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन नामदेव ढसाळ यांचे काम लोकांपुढे मांडायचे ठरविले. ढसाळांच्या कविता, साहित्य, आठवणी यांचा जागर महाराष्ट्रभर सुरू झाला. या प्रयोगांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात ‘हाउसफुल्ल’चा फलक लागला होता.
या जागराचा पुढचा टप्पा ‘साधना साप्ताहिका’च्या वतीने पुण्यात होत आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे रविवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ‘कोण नामदेव ढसाळ? तुही यत्ता कंची?’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना युवराज मोहिते यांची असून, त्यांच्यासह प्रसिद्ध कवयित्री नीरजा, प्रज्ञा दया पवार, शाहीर संभाजी भगत, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, मंदार फणसे, अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता कैलास वाघमारे, अक्षय शिंपी आणि दीपक राजाध्यक्ष यांचा सहभाग आहे. कार्यक्रम दोन तासांचा असून, वेळेवर सुरू होईल, अशी माहिती ‘साधना साप्ताहिका’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी दिली.
