पिंपरी : जनगणनेच्या कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.

जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या गृहसूची व गृहनिर्माण जनगणना प्रक्रियेचा आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आढावा घेतला. ‘जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आणि कालमर्यादित प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. जनगणनेदरम्यान माहिती संकलन, नोंदींची अचूकता आणि प्रशासकीय कामकाजामध्ये दक्षता बाळगावी. प्रशासकीय बाबींमध्ये दक्षता आणि शिस्त राखण्यावर भर द्यावा,’ असे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.

‘जनगणना प्रक्रियेमध्ये क्षेत्रीय पातळीवरील समन्वय, प्रगणकांना आवश्यक सहकार्य करून नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच, प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी माहिती संकलन करताना काटेकोरपणे नियमांचे पालन करावे,’ असेही आवाहन त्यांनी केले. प्रत्येक नोंद विश्वसनीय आणि त्रुटीविरहित राहण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने देखरेख आणि मार्गदर्शन केले जात असल्याचे शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, मनोज सेठिया, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांच्यासह उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सरगर, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पूजा दुधनाळे, मुकेश कोळप आदी उपस्थित होते.