पुणे : ‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला’ या ज्येष्ठ अभिनेते बापूराव पेंढारकर यांच्या आवाजातील पहिल्या मराठी भावगीताची शुक्रवारी शताब्दीपूर्ती झाली. या भावगीताचे कवी गोविंदाग्रज ऊर्फ नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिदिनी १०० वर्षांपूर्वी या गीताचे ध्वनिमुद्रण झाले. स्वरानंद प्रतिष्ठान निर्मित ‘मराठी भावसंगीत कोश’ या अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ग्रंथामध्ये या पहिल्या भावगीताविषयी माहिती देण्यात आली आहे.

प्रसिद्ध चित्रकार-लेखक रवीमुकुल या ग्रंथाचे संपादक असून, अदिती वळसंगकर-कुलकर्णी सहसंपादक आहेत. ग्रंथात संगीत अभ्यासक सुरेश चांदवणकर यांनी पहिल्या मराठी भावगीताच्या स्मृती कथन केल्या आहेत. ‘संगीत रंगभूमीवरील अभिनेते व्यंकटेश बळवंत तथा बापूराव पेंढारकर यांच्या आवाजात ‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला’ हे भावगीत २३ जानेवारी १९२६ रोजी ध्वनिमुद्रित झाले होते. शब्दप्रभू राम गणेश गडकरी म्हणजेच कवी गोविंदाग्रज हे या गीताचे निर्माते होते.

त्यांच्या ‘वागवैजयंती’ या कवितासंग्रहातील ही १८ कडव्यांची कविता जुलै १९१२ मध्ये लिहिली गेली. ‘ललितकलादर्श’ कंपनीचे मालक आणि गायक-अभिनेते बापूराव पेंढारकर यांनी गडकरी यांचे ‘पुण्यप्रभाव’ नाटक केले होते. नाटकातील पदांमुळे ते ग्रामोफोन कंपनीचे लोकप्रिय कलाकार होते. गडकरी यांच्या स्मृतिदिनी म्हणजे २३ जानेवारी १९२६ रोजी बापूराव मुंबईच्या फोर्ट येथील ग्रामोफोन कंपनीच्या स्टुडिओत गेले आणि ही कविता ध्वनिमुद्रित केली, अशी आठवण बापूराव यांचे पुत्र आणि ज्येष्ठ गायक-अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांनी सांगितल्याचे चांदवणकर यांनी या गीताविषयी नमूद केले आहे.

लिरिक’ म्हणून नोंद

‘बापूराव पेंढारकर यांनी गायलेले गीत नाटकातील नसल्याने ते ‘लिरिक’ म्हणून ध्वनिमुद्रित झाले. ‘पिलू’ रागातील हे गीत एप्रिल १९२६ मध्ये वितरित झाले होते. त्याच्या खपामुळे १९३१ मध्ये पुन्हा ध्वनिमुद्रिका बनविण्यात आल्या.

ध्वनिमुद्रिकेच्या आवरणावर ‘पिलू लिरिक’ असे छापले होते. यातील १८ कडव्यांपैकी चार कडवी बापूराव तीन मिनिटांत गाऊ शकले.

जलद गतीने गायलेल्या या गीताचा भाव आणि आशय नेमकेपणाने मांडला गेला आहे,’ असेही सुरेश चांदवणकर यांनी नमूद केले आहे.

बापूराव पेंढारकर यांच्यापूर्वी बाई सुंदराबाई या खासगी मैफलीत गात असत. पण, त्याविषयी अधिकृत नोंद उपलब्ध नाही आणि त्याची ध्वनिमुद्रिका निघाली नाही. त्यामुळे पहिल्या मराठी भावगीताचे श्रेय कवी गोविंदाग्रज आणि गायक बापूराव पेंढारकर यांच्याकडे जाते. रवीमुकुलसंपादक, मराठी भावगीत कोश