पुणे : या देशामध्ये समतेची, मानवभावाची आणि धर्मनिरपेक्षतेची परंपरा सुरू आहे. तर, त्याला विरोध करणारी वैदिकांची दुसरी परंपरा आहे. समृद्ध बौद्धिक परंपरा असूनही आपण शासनात जात नाही. संविधानाचे शासन देशात नाही. वैदिक परंपरा मानणाऱ्या शत्रूंनी आणि राज्यकर्त्यांनी आपल्याला जातीमध्ये वाटले. आपल्याला केवळ तोडले असे नाही. तर, जातीचा अभिमान बागळायला शिकविले. केंद्र आणि राज्यातील सरकार आपल्या मूर्खांपणाच्या बळावर आहे, असे भाष्य ज्येष्ठ कवी डाॅ. यशवंत मनोहर यांनी सोमवारी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  हे भेदाभेद सारून आपण एकत्र आलो, तर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची सत्ता आपण प्रस्थापित करू शकतो. आपण एकत्र येणे हे महाशक्ती होणे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते यशवंत मनोहर यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी मनोहर बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी खासदार पंकज भुजबळ, माजी आमदार कमल ढोले-पाटील, लेखक हरी नरके, परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा  मंजिरी धाडगे या वेळी उपस्थित होत्या.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : भाजपाच्या ‘आराध्य दैवतां’कडून शिवरायांचा अपमान – संजय राऊत ; राज्यभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी वाचा एका क्लिकवर

  मनोहर म्हणाले, जोतीराव फुले यांची पुण्यतिथी नसतेच. केवळ जयंती असते. तुमच्या आमच्यात असल्याने त्यांना मरण नाही. पुरस्कार मिळविण्यासाठी नाही तर काळजाला आग लागली म्हणून लिहिले. मी सत्य आणि माणूस निर्माण करण्यासाठी लिहितो. या देशात चुकीच्या श्रद्धांची आणि दैवतांची मंदिरे आहेत. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांची तत्वे घेऊन जगणारा मनुष्य असून त्यांच्या विचारांशी फारकत घेऊन मी कुठलेही पुरस्कार स्वीकारणार नाही. या सगळ्या महापुरूषांच्या विचारांनी मी भारावून गेलो असून ज्या व्यासपीठावर यांच्या प्रतिमा लावल्या जाणार नाहीत, ते व्यासपीठ माझे नव्हे. यासाठी कोट्यावधींचे पुरस्कार, मानसन्मान मला नाकारावे लागले तरी मी ते नाकारेन.

हेही वाचा >>> गणपतीच का? ३३ कोटी देव अभ्यासक्रमात घ्या!

ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आपले समाज बांधवच एकत्र येत नाहीत, अशी खंत व्यक्त करून भुजबळ म्हणाले, ६ डिसेंबरला मुंबईत लाखोंच्या संख्येने पोहोचणाऱ्या अनुयायांना आपल्या महामानवाला वंदन करा, हे सांगावे लागत नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी रायगडावर मोठ्या संख्येने शिवभक्त जमतात, त्यांना देखील सांगावे लागत नाही. मग आपल्याच समाजातील लोकांमध्ये ही उदासीनता का दिसून येते, हे कोडे मला न सुटणारे आहे.

हेही वाचा >>> पिंपरीतील नागरी प्रश्नांवरून राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल

सरकार कोणाचेही असो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित कोणताही विषय असला, तरी त्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकारतर्फे हजारो कोटी रूपये दिले जातात, मग हाच न्याय भिडे वाडा स्मारकासाठी का नसतो?, असा प्रश्न उपस्थित करून भुजबळ म्हणाले, महात्मा फुले वाडा ते सावित्रीबाई फुले सभागृह हा रस्ता जोडून का मिळत नाही, हा देखील प्रश्न आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी हजारो महिला स्वयंस्फूर्तीने जमा होतात. परंतु, त्याच मंदिरासमोरील भिडे वाडा येथे माथा टेकण्यासाठी कोणीही जात नाही. शिक्षण देणाऱ्या सावित्रीबाई यांच्यापेक्षा दोरे गुंडाळण्यासाठी सावित्री महिलांना महत्त्वाची वाटते.

पुणे  विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले. पण, विद्यापीठाच्या बोधचिन्हामध्ये त्यांचे चित्र नाही. अथर्वशीर्ष हा अभ्यासाचा विषय घेतला. पण, महात्मा फुले यांचे अखंड स्वीकारले नाही. भिडे वाड्याचे स्मारक आणि मजूर अड्ड्याच्या जागेवर मजूर भवन होत नाही. भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक कारण्याचा निर्णय झाला नाही तर १ जानेवारीपासून सत्याग्रहाची वाट धरून तुरुंगवारी करावी लागेल.

– डाॅ. बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central and state governments stupidity commentary dr yashwant manohar pune print news ysh
First published on: 28-11-2022 at 18:00 IST