पुणे : मध्ये रेल्वेंतर्गत लोहमार्गावरील स्थानकांची पुनर्बांधणी करून या स्थानकांवरून दक्षिणोत्तर धावणाऱ्या गाड्यांचे स्थलांतर होत नाही, तोपर्यंत पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होणार नाही, असे मत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच याबाबत युद्धपातळीवर काम सुरू असून गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानंतरच पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटांचे विस्तारीकरण वेगात सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे विभागांतर्गत दौंड-लाेणावळा लोहमार्गावर ‘क्रू लाॅब’, इलेक्ट्राॅनिक इंटरलाॅकिंग, अद्ययावत सुविधांयुक्त इमारत, प्रशिक्षण केंद्र, सोलर पॅनल, इलेक्ट्रिक लोको शेड, लेथ मशिन, ट्रॅक्शन सब स्टेशन आणि तपासणी वाहन सुविधांची अंमलबावणी नव्याने कऱण्यात आली आहे. याबाबत गोस्वामी यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून आढावा घेतला. केडगाव, दौंड, चिंचवड, संगम पूल या ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्षात पाहणी केली. त्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गोस्वामी बोलत होते. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला आणि इतर विभागीय अधिकारी या वेळी उपस्थित होते.
गोस्वामी म्हणाले, ‘पुणे रेल्वे स्थानकातील गाड्यांची संख्या पाहता खूप मोठा भार पडतो आहे. त्या दृष्टीने या स्थानकातील सहा फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा अत्याधुनिक स्वरुपाच्या असतील. तत्पूर्वी हडपसर, खडकी आणि इतर स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण होताच या ठिकाणांवरून नव्याने गाड्या सोडण्याची आमची प्राथमिकता आहे. जेणेकरून पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी होईल. गर्दीचे नियोजन, गाड्यांच्या वेळापत्रकात सुधार आणि व्यवस्थापन सहज करता येईल. स्थानकाची क्षमता लक्षणीय वाढेल.’
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत नवीन स्थानके निर्माण करण्यात येणार असून पुणे विभागातील अनेक प्रकल्पांचे नियोजनही प्रस्तावित आहे. हडपसर आणि खडकी रेल्वे स्थानकांवर विकासकामे जवळजवळ पूर्ण झाली आहेत. लवकरच ही स्थानके पूर्णपणे कार्यरत होतील, अशी अपेक्षाही गोस्वामी यांनी व्यक्त केली.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ऑक्टोबर महिन्यात नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होणार असून, याबाबत रेल्वे वाहतुकीसाठी स्वतंत्र दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यातून नाशिकला जाण्यासाठी साईनगर शिर्डी मुख्य स्थानक म्हणून नियोजित आहे. त्यानुसार शिर्डी स्थानकातील फलाट नव्याने वाढविण्यात येत आहे. अतिरिक्त गाड्या आणि मार्गाचे व्यवस्थापन करण्यात येईल, अशी माहिती राजेश कुमार वर्मा यांनी दिली.
पुणे रेल्वे स्थानकात अनधिकृत विक्रेते, फेरीवाले यांचा बंदोबस्त करण्यासाठी वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे. संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असल्याचेही वर्मा यांनी स्पष्ट केले.

