पुणे : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे उत्तरभारतातील गोरखपूरकडे जाणाऱ्या २४८ विशेष उन्हाळी गाड्या पुणे आणि मुंबई स्थानकातून सोडण्यात येणार आहे. या गाड्यांसाठी आजपासून (२६ एप्रिल) आरक्षण सुरू करण्यात आले आहे.

पुणे-गोरखपूर-हडपसर दैनिक उन्हाळी विशेष १२४ गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे स्थानकावरून १५ मे ते १५ जुलैपर्यंत दररोज सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी विशेष गाडी सुटणार असून, गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजता पोहचणार आहे. तर गोरखपूर स्थानकावरून १६ मे ते १६ जुलैपर्यंत दररोज सायंकाळी साडेपाच वाजता विशेष गाडी सुटणार असून, हडपसर येथे तिसऱ्या दिवशी सव्वातीन वाजता पोहचणार आहे.

या गाडीला दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरंगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती हे थांबे आहेत. या गाडीची रचना १ वातानुकूलित डबा, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे,  ६ शयनयान, ४ द्वितीय श्रेणीचे डबे आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी आहे.

या गाडीचे आरक्षण विशेष शुल्कासह २६ एप्रिलपासून आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी सामान्य शुल्कासह यूटीएस प्रणालीद्वारे आरक्षण करता येणार आहे. तिकीट बुकिंगसाठी रेलवन (RailOne) ॲपचा वापर करता येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी http://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर किंवा NTES ॲपवर माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतूनही विशेष गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक उन्हाळी विशेष १२४ गाड्या सोडण्यात येणार आहेत. १५ मे ते १५ जुलैपर्यंत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री साडेदहा वाजता सुटणार असून, गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता पोहोचणार आहेत. तर, गोरखपूर येथून १७ मे ते १७ जुलैपर्यंत दररोज दुपारी अडीच वाजता सुटणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोहचणार आहे.  या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद हे थांबे आहेत. या गाडीचा रचना १ वातानुकूलित डबा, ६ वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी आहे.