पिंपरी : पंजाब हे सीमेवरचे राज्य आहे आणि सीमेवरच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना अस्वस्थ ठेवल्यास त्याचे दुष्परिणाम होतात, याचा अनुभव यापूर्वी देशाने घेतला आहे. त्यामुळे केंद्राने त्यांचे आंदोलन गांभीर्याने घ्यावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले

आकुर्डी येथील पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, की आंदोलनाबाबत केंद्र सरकारची भूमिका सामंजस्याची वाटत नाही. आंदोलनात पंजाबचे शेतकरी जास्त असल्याने केंद्र सरकारने त्यांचे आंदोलन गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

ईडी, सीबीआय, प्राप्तीकर विभाग इत्यादींच्या छाप्यांबाबत पवार यांनी भाजपवर टीका केली. भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. बिगर भाजपशासित राज्यांना अस्थिर करण्याचा भाजपचा डाव स्पष्टपणे दिसतो. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग या शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेली छापेमारी, चौकशांमुळे राज्य सरकार अस्थिर होणार नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. इतकेच नव्हे, तर जनतेच्या पािठब्यावर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असे पवार यांनी सांगितले.

भाजप राजकीय आकसाने राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, तेथील सरकारला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे केंद्र सरकारचे धोरणच आहे. चांगल्या लोकांना अडकवणे, खोटे पुरावे निर्माण करणे, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पंच उभे करणे हे सर्रास सुरू आहे. असेच सुरू राहिल्यास कोणाचीही धरपकड केली जाईल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली.

पवार म्हणाले, सत्ता गेल्याचे दु:ख देवेंद्र फडणवीस यांना सहन होत नाही. हे सरकार टिकणार नाही असे म्हणणाऱ्या फडणविसांना अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते. ‘मी पुन्हा येईन’ याच्याशी ते सुसंगत आहे, अशी टीका पवार यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होईल की नाही, हे आताच सांगू शकणार नाही, असेही पवार म्हणाले. 

 ‘वसुलीचे सॉफ्टवेअर दाखवा

सरकारमधील मंत्र्यांकडून वसुलीचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते, या फडणविसांच्या आरोपाची खिल्ली उडवताना पवार म्हणाले, असे काही सॉफ्टवेअर असल्यास ते दाखवावे, आमच्याही ज्ञानात भर पडेल. पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने कोणतेही विधान करताना पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे.

पवार म्हणाले..

– केंद्रातील भाजप सरकारला सामान्यांच्या प्रश्नांविषयी अनास्था.

– विरोधी पक्षात असताना इंधनदरवाढीविरोधात आगपाखड करणाऱ्या भाजपचे आता मौन.

– केंद्राकडे असलेली राज्याची जीएसटीची ३५ हजार कोटींची थकबाकी दिली जात नाही, हे दुर्दैव. 

– मुंबईच्या बेपत्ता माजी पोलीस आयुक्तांचा थांगपत्ता लागत नाही, ही गंभीर बाब असूनही केंद्र सरकार गप्प राहिले.

– केंद्र सरकारच्या विरोधात बोलत राहतात म्हणून नवाब मलिक यांच्या जावयावर चुकीची कारवाई.

– शासकीय यंत्रणांवर आरोप होताच भाजप नेते बचावासाठी पुढे येतात, हे अनाकनीय.

– भाजप सोडून राष्ट्रवादीत येताच एकनाथ खडसे यांच्यावर खटले आणि छाप्यांचे सत्र.

किरीट सोमय्या यांचे बेछूट आरोप, नाटकबाजी केवळ प्रसिद्धीसाठी.

मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव इच्छुक नव्हतेच

उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा होती, त्यांनी उगीचच तत्त्वज्ञान सांगू नये, या फडणविसांच्या टीकेला पवारांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सर्वात जास्त आमदार शिवसेनेचे होते. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार होते. तीन नावे डोळ्यामोर होती. उद्धव मुख्यमंत्री व्हावेत, हा माझा आग्रह होता, त्यांची अजिबात तयारी नव्हती. पण मी सक्ती केली. उद्धव यांचा हात उंचावून मी सांगितले की, हेच मुख्यमंत्री होतील.